रेल्वे प्रवासादरम्यान तरुणीचा विनयभंग व्यापार्याला अटक
एक टक पाहत असल्याने तरुणीकडून विनयभंगाची तक्रार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – रेल्वे प्रवासादरम्यान एका २५ वर्षांच्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी हितेश ठक्कर या ४४ वर्षांच्या व्यापार्याविरुद्ध कुर्ला रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एक टक पाहत असल्याने या तरुणीने विनयभंगाची तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जरे या करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी सांगितले.
२५ वर्षांची तक्रारदार तरुणी ही ठाण्यात राहत असून ती गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता ठाण्यातून तिच्या कामावर जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात आली होती. यावेळी ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणार्या लोकलच्या मध्या प्रथम पुरुष वर्गाच्या डब्ब्यात बसली होती. मुलुंड रेल्वे स्थानक आल्यानंतर हितेश ठक्कर हे लोकलमध्ये चढले होते. काही वेळानंतर ते तिच्या समोरच्या सीटवर बसले होते. त्यानंतर हितेश हे तिच्याकडे एक टक पाहत होते. त्यामुळे तिने त्यांना तुम्ही मला ओळखता का, तर पुन्हा पुन्हा तिच्याकडे का पाहत आहेत अशी विचारणा केली होती. यावेळी त्यांनी तिला मी तुझ्याकडे पाहत नाही. मला माझे कुटुंब आहे. तु माझ्या मुलीसारखी आहे असे सांगितले.
ही लोकल मशिद बंदर येथे येताच या तरुणीने रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या प्रवाशाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी या प्रवाशाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात या प्रवाशाचे नाव हितेश ठक्कर असून तो मुलुंड येथे राहतो. हितेश हा व्यवसायाने व्यापारी आहे. हा गुन्हा कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्याचा तपास नंतर तिथे वर्ग करण्यात आला होता. याप्रकरणी हितेशविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. एक टक पाहिले म्हणून या तरुणीने थेट पोलिसांत तक्रार केल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रवासादरम्यान अशाच प्रकारच्या घटना घडत असतात. मात्र हितेशविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.