सतरा वर्षांच्या मुलीशी अश्लील वर्तन करुन विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत 33 वर्षांच्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 नोव्हेंबर 2025
मुंबई, – क्लासला जाणार्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील संभाषण करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार घाटकोपर रेल्वे स्थानकात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल होताच 33 वर्षांच्या आरोपीस कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने 4 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.
बळीत मुलगी ही तिच्या कुटुंबियांसोबत विक्रोळी परिसरात राहते तर घाटकोपर येथे नेहमी क्लाससाठी जात होती. गेल्या काही दिवसांपासून आरोपी तिचा पाठलाग करत होता, मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते. सोमवारी ती नेहमीप्रमाणे घरातून क्लासला जाण्यासाठी निघाली होती. घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरुन ती पायी जात असताना तिथे आरोपी आला आणि त्याने तिचा हात पकडून अश्लील संभाषण करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली.
तिने आरडाओरड करताच आरोपी तेथून पळून गेला होता. दोन दिवसांनी तिला विक्रोळी परिसरात आरोपी दिसला होता. त्यामुळे तिने घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. बळीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा घाटकोपर रेल्वे स्थानकात घडल्याने त्याचा तपास नंतर कुर्ला रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.
गुन्ह्यांचा तपास हाती येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीस गुरुवारी अटक केली होती. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.