सीटवरुन झालेल्या वादातून प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलासह दोघांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – लोकल प्रवासादरम्यान सीटवर बसण्याच्या वादातून एका ३५ वर्षांच्या प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. अंकुश भगवान भालेराव असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह त्याच्या मोठ्या भावाला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला डोगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले तर त्याचा भाऊ मोहम्मद सनाउल्लाह शेख ऊर्फ सोहेल बेठा याला कुर्ला येथील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अंकुश यांची अल्पवयीन मुलाने हत्या केली असून या हत्येत त्याला मोहम्मद सनाउल्लाहने मदत केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे पोलिसांनी सांगितले. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांनी दुजोरा दिला.
अंकुश भालेराव हा टिटवाळा येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. घाटकोपर येथे एक वाई शॉप असून तिथेच तो मॅनेजर म्हणून कामाला होता. गुरुवारी १४ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी टिटवाळा रेल्वे स्थानकात आला होता. यावेळी त्याने सीएसटीला जााणार्या जलद लोकल पकडली होती. यावेळी सीटवर बसण्याच्या वादातून त्याचे एका सोळा वर्षांच्या मुलाशी वाद झाला होता. रागाच्या भरात त्याने त्याच्या कानशिलात लगावली होती. यावेळी या मुलाने त्याला उद्या तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती. दुसर्या दिवशी अंकुश पुन्हा त्याच लोकलने घाटकोपरला जाण्यासाठी प्रवास करत होता. पावणेदहा वाजता ही लोकल घाटकोपर रेल्वे स्थानकात आली होती. फलाट चारवरुन पायी चालत जाताना अचानक त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. त्यात अंकुश हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रेल्वे पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शुक्रवारी १५ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध १०३ (१), १०९ (१), ३५१ (३), १३५ भारतीय न्याय सहिता सहकलम ४, २५, २७ भारतीय हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एसटीएफ पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर एसटीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, गुन्हे शाखेचे रोहित सावंत, कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव, पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत व अन्य पोलीस पथकाने तपासाला सुरुवात केली होती. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी गोवंडी येथून अल्पवयीन आरोपी मुलासह त्याचा मोठा भाऊ मोहम्मद सन्नाउल्लाहला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत याच मुलाने अंकुश गायकवाडची चाकूने हल्ला केल्याचे उघडकीस आले. हत्येनंतर त्याने चाकूने घराच्या पत्र्यावर लपवून ठेवले होते. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने केस कापले होते. १४ नोव्हेंबरला त्याला कामावर जाण्यास उशिर झाला होता. त्यामुळे तो अंकुश ज्या लोकलने प्रवास करतो, त्याच लोकलमध्ये चढला होता. यावेळी सीटवरुन त्याचे अंकुशसोबत भांडण झाले होते. यावेळी अंकुशसह इतर दोन प्रवाशांनी त्याला मारहाण केली होती. मात्र त्याने अंकुशचा चेहरा लक्षात ठेवला होता. दुसर्या दिवशी तो पुन्हा टिटवाळा रेल्वे स्थानकात आला. त्याने अंकुशसोबत लोकलने प्रवास केला होता. घाटकोपर रेल्वे स्थानकात तो उतरल्यानंतर त्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो ट्रॅकवरुन उडी मारुन पळून गेला होता. ही माहिती त्याने त्याचा भाऊ मोहम्मद सनाउल्लाहला सांगितली. यावेळी त्याने त्याला हत्येचा पुरावा नष्ट करण्यास मदत केली होती. त्यामुळे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.