मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – घरखर्चावरुन सुरु असलेल्या कौटुुंबिक वादातून एका २४ वर्षांच्या महिलेने स्वतच्या दहा महिन्यांच्या मुलाला कुर्ला येथील लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाच्या हॉलमध्ये सोडून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने या महिलेची ओळख पटविण्यात आली असून तिला चौकशीसाठी हजर राहण्याची कायदेशीर नोटीस कुर्ला रेल्वे पोलिसांकडून बजाविण्यात आले आहे. दरम्यान दहा महिन्यांच्या या मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
पोलीस अंमलदार हिरवे हे कुर्ला रेल्वे स्थानकात कार्यरत आहे. मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता ते कुर्ला येथील लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. यावेळी त्यांना दहा महिन्यांचा एक बाळ कपड्यात गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले. या बाळाला कोणीतरी तिथेच सोडून पलायन केले होते. रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर एक महिला बाळाला सोडून पळून गेल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ९३ भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या महिलेचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना एका रिक्षाचालकाच्या मदतीने आरोपी महिलेची ओळख पटली. ही महिला कुर्ला येथे तिच्या पती आणि तीन मुलांसोबत राहते. तिचा पती टॅक्सीचालक म्हणून काम करतो. ते कुटुंबिय तेथील भाड्याच्या रुममध्ये राहतात.
गेल्या काही महिन्यांत या महिलेचे तिच्या पतीसोबत कौटुंबिक वाद होता. तो तिला घरखर्चासाठी पैसे देत नव्हता. त्याने दोन महिन्यांचे भाडे भरले नव्हते. दोन दिवसांपूर्वी तिचे तिच्या पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे तिने रागाच्या भरात त्याला मुलाला घेऊन जा, यापुढे तूच तुझ्या मुलाचा सांभाळ कर अशी धमकी दिली होती. त्याने नकार देताच ती तिच्या मुलाला घेऊन कुर्ला रेल्वे स्थानकात आली होती. तिथेच तिने मुलाला ठेवून पलायन केले होते. मात्र सीसीटिव्ही फुटेजवरुन तिची ओळख पटली. तिला कुर्ला रेल्वे पोलिसांकडून कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. तिच्या मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले जाणार आहे. या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक राजेभोसले तपास करत आहेत.