समलिंगी संंबंध उघड होण्याच्या भीतीने 33 वर्षांच्या व्यक्तीची आत्महत्या
अल्पवयीन मुलाविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कोणीही राहत नसलेल्या मोकळ्या इमारतीमध्ये समलिंग संबंध ठेवतो म्हणून एका 33 वर्षांच्या व्यक्तीला त्याच्या पालकांना घडलेला प्रकार सांगून त्यांना तिथे बोलाविण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने मानसिक नैराश्यातून संबंधित व्यक्तीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. या व्यक्तीला आत्महत्या करण्यास एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सुलेमान नावाच्या मुलाविरुद्ध पोलिसांनी ब्लॅकमेल करुन बदनामीची धमकी देऊन, मृत व्यक्तीच्या पालकांना तिथे बोलावण्याची धमकी देऊन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या आत्महत्येमागील खरे कारण पुढे आल्यानंतर मृत व्यक्तीच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
33 वर्षांचे मृत राजेश हा विद्याविहार येथे राहत होता. रविवारी 9 नोव्हेंबरला दुपारी दिड वाजता राजेशने कुर्ला येथील किरोळ रोड, एचडीआयएल इमारत क्रमांक नऊच्या पाचव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तपासादरम्यान या इमारतीमध्ये कोणीही राहत नसून संपूर्ण इमारत रिकामी आहे. पाचव्या मजल्यावर पोलिसांना राजेशचा एक टी शर्ट सापडला होता. हा टी शर्ट नंतर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. ही माहिती नंतर त्याच्या वयोवृद्ध आईला देण्यात आली होती. तिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत तिने या आत्महत्येची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची विनंती पोलिसांना केली होती. राजेश हे विद्याविहार येथे राहत होते. मात्र आत्महत्या करण्यासाठी तो कुर्ला येथे आला होता.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी कुर्ला-विद्याविहारदरम्यानचे सर्व सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी राजेश काही लोकांना भेटले होते. त्यामुळे त्यापैकी तीन तरुणाना पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविले होते. त्यांच्या चौकशीत सुलेमान नावाच्या एका सतरा वर्षांच्या मुलाचा उल्लेख झाला होता. सुलेमान हा घाटकोपर येथे राहत असून शिक्षण घेत आहे. सकाळी ते तिघेही सुलेमानला भेटल्याचे उघडकीस आले होते. त्याने त्यांना त्याचे राजेशशी समलिंगी संंबंध असल्याचे सांगितले होते. तो याच संबंधासाठी पैसे देतो. या तिघांपैकी एका तरुणाला तो त्यांची भेट घडवून आणणार होता. त्यासाठी राजेश त्याला पैसे देणार होता. त्यामुळे या मुलाने सुलेमानसोबत जाण्याची तयारी दर्शविली होती.
9 नोव्हेंबरला सुलेमानने त्याच्या मोबाईलवरुन एका खाजगी अॅपवर राजेशला संबंधित तरुणाचा फोटो पाठवून त्यांना एचडीआयएल कंपाऊंड, विद्याविहार येथ बोलावून घेतले होते. ठरल्याप्रमाणे त्याने त्याला पाचव्या मजल्यावर पाठविले होते. तिथे आधीच राजेश आला होता. या दोघांमध्ये समलिंगी संंबंध सुरु असताना सुलेमानने इतर दोघांच्या मदतीने तिथे घडलेला प्रकार दाखविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर या तिघांनी या तरुणासह राजेशला मारहाण करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राजेशला हा काय प्रकार सुरु आहे, तुझ्या आई-वडिलांना हा प्रकार समजला तर तुझे काय होईल. थांब तुझ्या पालकांना फोनवरुन तुमचा मुलगा काय करतो हे सांगतो असे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.
यावेळी घाबरलेल्या राजेशने सुलेमानला काही पैसे देऊन त्यांची बदनामी करु नकोस अशी विनंती केली. तरीही त्याने त्यांना त्याच्या पालकांना बोलविण्याची धमकी दिली होती. यावेळी राजेशने आत्महत्येची धमकी देत पालकांना बोलावणार नाही असे सांगितले. यावेळी इतर तिन्ही तरुणांनी सुलेमानने त्याला सोडून देण्याची विनंती केली होती, मात्र सुलेमानने त्यांना बिअरची बाटली फोडून जिवे माण्याची धमकी दिली होती. तो राजेशला त्याच्या कुटुंबियांना बोलाविण्यावर ठाम होता.
बदनामी भीतीने मानसिक नैराश्यातून राजेशने पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर ते चौघेही प्रचंड घाबरले आणि तेथून पळून गेले. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तायडे यांनी सुलेमानविरुद्ध राजेशला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सागितले.