अपहरणानंतर अल्पवयीन मुलाच्या हत्येतील नातेवाईकाला अटक
हत्येनंतर मृतदेह कुशीनगर एक्सप्रेसमध्ये टाकून पलायन केले होते
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 ऑगस्ट 2025
मुंबई, – सुरत येथून अपहरण झालेल्या आकाश ऊर्फ आरो राजेंद्र शहा या अल्पवयीन मुलाची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपीस सुरत पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. विकासकुमार बिशूल दयालविरास शाह असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मृत मुलाच्या मावसभाऊ आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सुरत येथे नेण्यात आले. हत्येनंतर तीन दिवसांपासून त्याच्या मागावर मुंबईसह सुरत पोलीस होते, अखेर तीन दिवसांनी त्याला वांद्रे येथील बीकेसी परिसरातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथून निघालेली कुशीनगर एक्सप्रेस शनिवारी पहाटे कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आली होती. सर्व प्रवाशी उतरल्यानंतर सफाई कर्मचार्यांनी एक्सप्रेसची सफाई करण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान बी-दोन एसी कोचच्या स्वच्छतागृहात एका मुलाचा मृतदेह एका कर्मचार्याच्या निदर्शनास आला. ही माहिती नंतर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी मुलाला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात मृत मुलाचे नाव आकाश शहा असल्याचे उघडकीस आले. आकाश हा त्याच्या पालकांसोबत गुजरातच्या सुरत शहरात राहत होता. त्याचे त्याचा मावसभाऊ विकासकुमारने अपहरण केले होते.
अपहरणानंतर ते दोघेही कुशीनगर एक्सप्रेसमधून मुंबईत आले होते. मात्र मुंबईत येण्यापूर्वीच विकासकुमारने आकाशची हत्या करुन त्याचा मृतदेह स्वच्छतागृहात टाकून पलायन केले होते. दुसरीकडे आकाशची मिसिंगची तक्रार त्याच्या पालकांनी सुरत पोलिसांत केली होती. तपासात या अपहरणामागे विकासकुमारचा सहभाग उघडकीस येताच त्याच्या अटकेसाठी सुरत पोलीस मुंबईत आले होते. मात्र मुंबईत आल्यानंतर त्यांना अपहरण झालेल्या आकाशची हत्या झाल्याचे समजले. या हत्येनंतर विकासकुमार हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी मुंबईसह सुरत पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली होती.
सीसीटिव्ही फुटेजवरुन विकासकुमार दादर येथून वांद्रे आणि नंतर बीकेसी येथे आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिथे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. या परिसरात मजुरांना कामासाठी ठेवले जात होते, तिथे नेहमीच मजुरांची गर्दी असल्याने तो त्यात गर्दीत मिसळून नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले, चौकशीत त्यानेच आकाशची हत्या केल्याची कबुली दिली. तपासात विकासकुमार हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून तो पूर्वी सौदी अरेबियाच्या कतार शहरात मजुरीचे काम करत होता. एप्रिल 2025 रोजी तो बिहारला परत आला होता. त्याच्याकडे काहीच काम नसल्याने तो दुसर्या कामाच्या शोधात होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो त्याच्या आईसोबत तिच्या सुरत येथील घरी आला होता.
दिवसभर घरी राहून काहीच कामधंदा करत नसल्याने त्याची मावशी आणि आकाशची आई त्याला सतत टोमणे मारत होती. त्याला दुसर्या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहण्यास सांगत होता. मावशीच्या टोमण्याने तो प्रचंड संतप्त झाला होता. तिचा सूड घेण्यासाठी त्याने आकाशचे अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याची पोलिसांना सांगितले. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सुरत येथे नेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर सुरत पोलिसांनी भर दिला आहे.