केवायसी नावाने कर्ज घेऊन साडेसहा लाखांची फसवणुक
माटुंगा येथील घटना; अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जुलै २०२४
मुंबई, – केवायसी अपडेटसाठी कॉल करुन मोबाईलचा ताबा घेऊन दहा लाखांचे कर्ज घेऊन साडेसहा लाखांचा अपहार करुन दोन अज्ञात सायबर ठगांनी एका रियल इस्टेट व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा प्रकार दादर परिसरात घडली. याप्रकणी दोन्ही ठगाविरुद्ध माटुंगा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
३७ वर्षांचे तक्रारदार दानिश होशी पटेल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत दादर परिसरात राहत असून ते रियल इस्टेट म्हणून काम करतात. १७ जुलैला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला, मात्र त्यांनी तो कॉल घेतला नाही. काही वेळानंतर त्यांना त्याच मोबाईल क्रमांकावरुन एक मॅसेज आला होता. त्यात त्यांचे पॅनकार्ड केवायसी अपडेट करणे बाकी आहे, ते अपडेट करा नाहीतर त्यांचे बँक खाते ब्लॉक होईल असे नमूद केले होते. या मॅसेजमध्ये एक लिंक पाठविण्यात आली होती, मात्र त्यांनी ती लिंक ओपन केली नाही. काही वेळानंतर त्यांना अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो त्यांच्या बॅकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्याने त्यांना केवायसी अपडेटविषयी विचारणा केली. त्यांनी बँकेत जाऊन केवायसी अपडेट करु असे सांगितल्यानंतर त्याने बँकेत केवायसी होणार नाही. अपडेटचे काम ऑनलाईन होते असे सांगून त्यांना लिंकवर अपडेट करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन करताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेतला. त्यामुळे त्यांच्या मोबाईलवर येणारे कॉल बंद झाले होते. काही वेळाने दुसर्या व्यक्तीने त्यांच्या पत्नीला कॉल करुन त्यांचा कॉल लागत नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी मोबाईलची सेटींग चेक केली. त्यात त्यांना त्यांच्या मोबाईलचे बहुतांश ऍप्लिकेश काढून टाकण्यात आल्याचे दिसून आले. त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन अज्ञात ठगांनी दहा लाखांचे कर्ज घेतले होते, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होताच त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ६ लाख ५९ हजार रुपये काढण्यात आले होते.
बँक खात्यातून पैसे डेबीट झाल्याचे मॅसेज प्राप्त होताच त्यांनी बँकेत कॉल करुन त्यांचे बँक खाते ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यामुळे बँकेने त्यांचे खाते ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माटुंगा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दोन्ही अज्ञात सायबर ठगांविरुद्ध ३१८ (४), ३१९ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ६६ (सी), (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात या ठगांनी दानिश पटेल यांचा मोबाईलचा ऍक्सेस प्राप्त करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले.