हत्येच्या गुन्ह्यांतील तरुणीचा हॉस्पिटलमधून पलायनाचा प्रयत्न
पळून जाणार्या तरुणीला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मार्च 2025
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 20 वर्षांच्या आरोपी तरुणीने जे. जे हॉस्पिटलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पळून जाणार्या या तरुणीला पाठलाग करुन पोलिसांनी शिताफीने अटक केली. सोनिया राहुल सांकेत असे या तरुणीचे नाव असून तिच्याविरुद्ध जे. जे मार्ग पोलिसांनी कायदेशीर रखवलीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी घडलेला या घटनेने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
गेल्या वर्षी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हत्येची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सोनिया सांकेत या तरुणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत हत्येच्या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आला होता, त्यानंतर तिला याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ती भायखळा येथील महिलांच्या जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. शुक्रवारी तिच्या बाळाची प्रकृती बिघडल्याने तिला बाळासोबत वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. पीआयसीयु वॉर्ड क्रमांक 37 मधून बाथरुमच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरुन जाताना तिने गर्दीचा फायदा घेऊन पोलिसांच्या हातावर जोरात झटका दिला होता. त्यानंतर तिने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिचा पाठलाग केला होता. काही अंतरानंतर तिला या पोलिसांनी पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर महिला पोलीस शिपाई निलिमा नरेश शंभरकर हिच्या तक्रारीवरुन जे. जे मार्ग पोलिसांनी सोनियाविरुद्ध कायदेशीर रखवलीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.