मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जून २०२४
मुंबई, – विमानाच्या प्रसाधनगृहात बॉम्ब ब्लॅक बॅग असा मॅसेज मिळालेला टिश्यू पेपर सापडल्याने त्रिवेंद्रमहून मुंबईला जाणार्या विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई विमानतळावर विमान लॅड होताच संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली, मात्र कुठेही पोलिसांना आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बचा तो मॅसेज बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अज्ञात प्रवाशाविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजश्री रविंद्र हगजर ही तरुणी मिरारोड येथे राहत असून एका खाजगी विमान कंपनीत क्रू मेंबर म्हणून नोकरी करते. शुक्रवारी दुपारी एक वाजता त्रिवेंद्रमहून मुंबईला जाणार्या विमानाने उड्डान केले होते. प्रवासादरम्यान अज्ञात प्रवाशाने विमानाच्या प्रसाधनगृहात पांढर्या रंगाच्या टिश्यू पेपर बॉम्ब ब्लॅक बॅग असा मॅसेज लिहून ठेवला होता. राजश्री हगजर ही रुटीन चेकअप करताना तिला प्रसाधनगृहात बॉम्बचा मॅसेज असलेला टिश्यू पेपर निदर्शनास आला होता. त्यामुळे तिने तिच्या वरिष्ठांना ही माहिती दिली होती. बॉम्बच्या या मॅसेजमध्ये विमानातील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॅण्ड होताच बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानासह प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली होती. मात्र तिथे पोलिसांना कुठलीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे राजश्री हगजर हिने कंपनीच्या वतीने सहार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात प्रवाशाविरुद्ध विमानातील प्रवाशांमध्ये भीती निर्माण करुन अशांतता निर्माण होईल, प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचात तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.