मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2025
मुंबई, – लोन बंद करण्यासाठी खातेदाराच्या पैशांचा बँकेच्या क्रेडिट अधिकार्याने अपहार करुन फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राज हेमंत निवाडकर या 27 वर्षांच्या अधिकार्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विशाल मधुकर सुर्वे हे कल्याणच्या अनुपम नगर परिसरातील रहिवाशी असून एका खाजगी बँकेत एरिया क्रेडिट मॅनेजर म्हणून कामाला आहेत. बोरिवलीतील कस्तुरबा मार्ग परिसरात त्यांच्या बँकेची शाखा आहे. याच शाखेत राज निवाडकर हा क्रेडिट अधिकारी म्हणून कार्यरत होता. जानेवारी ते ऑगस्ट 2024 या कालावधीत बँकेत काम करताना त्याने त्याचा पदाचा गैरवापर केला होता. बँकेच्या खातेदारांनी घेतलेले कर्ज बंद करण्यासाठी त्याने काही खातेदारांकडून पैसे घेतले होते. मात्र ही रक्कम बँकेत जमा न करता, खातेदारांचे कर्जाचे खाते बंद न करता त्याने 4 लाख 6 हजार 238 रुपयांचा परस्पर अपहार करुन बँकेसह खातेदारांची फसवणुक केली होती. हा प्रकार काही खातेदारांकडून बँकेच्या निदर्शनास येताच बँकेने त्याची गंभीर दखल घेतली होती.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विशाल सुर्वे यांना दिले होते. तपासादरम्यान राज निवाडकर यानेच खातेदारांच्या पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर बँकेच्या वतीने त्यांनी राजविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राज निवाडकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.