कर्ज देऊन महिलेचे अश्‍लील मॉर्फ फोटो व्हायरल करुन बदनामी

दिल्लीतील दोन विद्यार्थ्यांना अटक; सिमकार्डसह बँक खाती पुरविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जून २०२४
मुंबई, – आधी कर्ज द्यायचे आणि नंतर कर्जाच्या वसुलीसाठी धमकावून मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो व्हायरल करुन सोशल मिडीयावर बदनामी करणार्‍या एका टोळीचा बांगुरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दिल्लीतील दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली असून या दोघांनी सायबर ठगांना सिमकार्डसह बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. मुदित दिपक जैन आणि लवलित नरेशकुमार ऊर्फ निखील अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने लोन ऍपच्या माध्यमातून फसवणुकीसह मॉर्फ फोटो व्हायरल करुन बदनामी झालेल्या अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

यातील तक्रारदार महिला गोरेगाव परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिला पैशांची गरज होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिनयांत तिने एका लोन ऍपवरुन ३७ हजाराच्या कर्जासाठी अर्ज केला होता. यावेळी तिने तिचे फोटो, वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती अपलोड केली होती. त्यानंतर तिला प्रोसेसिंग फीसह इतर कर वगळून २१ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. ही रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. ही रक्कम जमा झाल्यानंतर काही दिवसांत तिला अज्ञात व्यक्तीकडून कर्जाच्या वसुलीसाठी धमकी येऊ लागले. कर्जाची रक्कम जमा केली नाहीतर तिची बदनामीची धमकी दिली जात होती. काही दिवसांनी तिचे मॉर्फ केलेले फोटो तिच्यासह तिच्या नातेवाईकांना पाठवून अज्ञात व्यक्तीने तिची बदनामी केली होती. लवकरच कर्जाची रक्कम दिली नाहीतर तिचे मॉर्फ केलेले अश्‍लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करु अशी धमकीच त्याने तिला दिली होती. या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध ३५४ अ, ३५४ डी, ३८५, ५०७ भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर बांगुरनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेसह सायबर सेलच्या अधिकार्‍यांनी संमातर तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन संबंधित आरोपी दिल्लीतील रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांची एक टिम दिल्लीला गेले होते. या पथकाने दिल्लीतील रोहणी परिसरातून लवलीत ऊर्फ निखील आणि मुदीत जैन या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात ते दोघेही विद्यार्थी असून ते कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. लोनच्या माध्यमातून फसवणुक करणारी ही चायनीस टोळी आहे. या टोळीच्या मुख्य आरोपींच्या ते दोघेही संपर्कात होते. या आरोपींसाठी त्यांनी बोगस सिमकार्डसह बँक खाती पुरविली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. ही रक्कम नंतर ते दोघेही त्यांच्या कटातील मुख्य आरोपींना देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहै. या टोळीने मुंबईसह इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page