कर्जासाठी दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करुन पैशांचा अपहार
फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – कर्ज देतो असे सांगून प्रोसेसिंग फीसाठी दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करुन पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. दिलीप विश्वनाथ चौहाण असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
मंदार मनिराम राणे हे मालाडच्या भंडारवाडा, मानव निकेतन अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांना पैशांची गरज होती, त्यामुळे त्यांनी त्यांचे राहते घर तारण ठेवून कर्जासाठी प्रयत्न सुरु केले होते. याच संदर्भात चौकशी करण्यासाठी ते बोरिवलीतील एका फायनान्स कंपनीत गेले होते. या चौकशीनंतर घरी आल्यानंतर त्यांना दयाशंकर नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो श्रीराम फायनान्समधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना कर्जाची आवश्यकता आहे का अशी विचारणा करुन त्यांना कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी होकार दर्शविल्यानंतर त्याने त्यांच्याकडून त्यांचे वैयक्तिक कागदपत्रांसह तीन धनादेश घेतले होते.
4 ऑगस्टला त्यांच्या घरी श्रीराम फायनान्स कंपनीचे दोन प्रतिनिधी शहानिशा करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी त्यांना दयाशंकरने पाठविल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांना प्रोसेसिंग फीसाठी आणि दोन कॅन्सल असे तीन धनादेश व इतर दस्तावेज दिले होते. कॅन्सल धनादेशावर त्यांनी सही किंवा तारीख टाकली नव्हती. या दोघांनी त्यांना किमान बँकेत एक लाख रुपये बॅलेन्स ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले होते. दुसर्या दिवशी दयाशंकरने त्यांना कॉल करुन एक लाख रुपये खात्यात जमा केले का याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी त्याला होकार दिला होता. त्यानंतर त्याने त्यांच्या कॅन्सल धनादेशावर त्यांची बोगस सही आणि तारीख टाकून खात्यातून 99 हजार रुपये काढले होते.
पैसे डेबीट झाल्याचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार समजला होता. त्यानंतर त्यांनी दयाशंकरला कॉल केला होता, मात्र त्याने त्यांचा कॉल घेतला नाही. या घटनेनंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दिलीप चौहाण या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.