कर्जाच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणार्या भामट्याला अटक
मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुण्यात आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 सप्टेंबर 2025
मुंबई, – कर्जाच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणार्या एका रेकॉर्डवरील भामट्याला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण मारुती जोगळेकर असे या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यात फसवणुकीच्या आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून 27 मोबाईल, विविध बँकेचे 25 डेबीट कार्ड, विविध बँकांचे 53 खातेबुक, पासबुक, एक राऊटर, 13 हजार 400 रुपयांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या चौकशीतून फसवणुकीचे इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मिनल मर्चंडे ही महिला भायखळा येथील सातरस्ता सर्कल परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिला एका वर्तमानपत्रात कर्जाविषयी जाहिरात दिसली होती. त्यात एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे तिने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरुन बोलणार्या लक्ष्मणने तिला तो बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करुन त्याने आतापर्यंत अनेक गरजू लोकांना कमी व्याजदारात कर्ज मिळवून दिल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याच्याकडे कर्जासाठी अर्ज केला होता. त्यासाठी तिने त्याला तिचे सर्व कागदपत्रे दिली होती. या कागदपत्रानंतर त्याने तिला त्याचे बोगस ओळखपत्र, कर्ज मंजुरीचे पत्र पाठविले होते. कर्जाच्या प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी त्याने तिच्याकडून सत्तर हजार रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिला कर्ज मिळवून दिले नाही.
कर्जाच्या आमिषाने लक्ष्मणने तिची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने आग्रीपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून लक्ष्मणविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी लक्ष्मणविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासात आरोपीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना लक्ष्मण हा नवी मुंबईतील उलवे परिसरात राहत असून तेथूनच तो अनेकांना कर्जाच्या आमिषाने गंडा घालत असल्याची माहिती समजली होती.
या माहितीनंतर या पथकाने उलवे येथील राहत्या घरातून लक्ष्मण जोगळेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याची कबुली दिली. यावेळी त्याच्या घरातून पोलिसांनी मोबाईलसह विविध बँकेचे पासबुक, चेकबुक, राऊटरसह कॅश असा मुद्देमाल जप्त केला होता. तपासात लक्ष्मण हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीसह फसवणुकीचे तुर्भे पोलीस ठाण्यात तीन, पनवेल शहर, भोसरी, विमानतळ,, ठाणे नगर, माटुंगा पोलीस ठाण्यात प्रत्येकी असे आठ गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.