मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जून २०२४
मुंबई, – कंपनीचा सिव्हील रेकॉर्ड चांगला करुन मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिक बंधूंची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या जीगर सतीशकुमार दोशी या आरोपीस दिडोंशी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत कविता जीगर दोशी ही सहआरोपी असून तिचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी तक्रारदार बंधूंना कर्जाचे आमिष दाखवून पंधरा लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
मेहुल सुरेश कारिया हे कांदिवली परिसरात राहत असून त्यांची वसई येथे निलकेम ऍडेसिव्ह इंडस्ट्रिज नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत गम बनविण्याचे काम होत असून त्याची मुंबईसह देशभरात विक्री जाते. कंपनीच्या वाढीसाठी त्यांनी काही खाजगी बँकांसह अर्थपुरवठा कंपनीकडून ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते कंपनीकडून नियमित भरले जात होते. मात्र कोरोनामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि त्यांना कंपनी बंद करावी लागली होती. कोरोनानंतर त्यांनी पुन्हा कंपनीचे काम सुरु केले होते. मात्र कंपनीचे उत्पन्न आणि व्यवसाय वाढीसाठी त्यांना पुन्हा कर्जाची आवश्यकता होती. त्यांनी विविध बँकांसह अर्थपुरवठा करणार्या कंपनीकडे कर्जासाठी अर्ज केले होते, मात्र जुन्या कर्जाचा सिव्हील रेकॉर्ड खराब असल्याने त्यांना कर्ज मिळत नव्हते. सप्टेंबर २०२२ रोजी त्यांना कविता दोशी या महिलेने फोन करुन ती सूर्या इंटरप्रायजेस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तिने त्यांना कंपनीचे सिव्हील रेकॉर्ड चांगले करुन कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांना जीगर दोशी याने फोन करुन त्यांची कंपनी अशाच कंपन्यांसाठी अर्थपुरवठा करण्याचे काम करत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. ठरल्याप्रमाणे त्यांची त्यांच्या कार्यालयात भेट झाली होती. या भेटीत या दोघांनी त्यांना कंपनीचा सिव्हील रेकॉर्ड चांगला बनवून कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज देतो असे सांगितले. त्यासठी त्यांनी त्यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहाराचे कागदपत्रांसह वैयक्तिक दस्तावेज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी त्यांना १५ लाख ३३ हजार रुपये दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. कॉल केल्यानंतर कविता आणि जगीर दोशी विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कविता आणि जीगर दोशी यांच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या जीगरला पोलिसांनी अटक केली तर कविताचा पोलीस शोध घेत आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.