कर्जासाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन फसवणुक
महिलेच्या नावाने कर्ज घेणार्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मे 2025
मुंबई, – ऑनलाईन कर्ज मिळवून देतो असे सांगून एका महिलेकडून कर्जासाठी घेतलेल्या कागदपत्रांसाठी गैरवापर करुन तिच्या नावाने कर्ज काढून फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली आवेदशअली अहमद कुरेशी असे या 23 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत अनिल, अनिता चिकणे आणि स्वाती गवाणे असे तिघेही सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्युली जोसेफ फर्नाडिस ही महिला मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून जेवणाचे डब्बे देण्याचे काम करते. याच परिसरात अनिता चिकणे ही राहत असून ती तिच्या परिचित आहेत. तिला पैशांची गरज असल्याने तिने तिच्याकडे कर्जाविषयी बोलणी केली होती. यावेळी अनिताने तिला ऑनलाईन कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान तिने तिची ओळख अनिल, आवेश आणि स्वातीशी करुन दिली होती. ते तिघेही तिला ऑनलाईन कर्ज मिळवून देतील असे सांगून तिने तिला कर्जासाठी प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते. तिच्याकडून होकार मिळताच त्यांनी तिच्याकडून तिची वैयक्तिक दस्तावेज घेतले होते.
काही दिवसांनी तिला तिचे पाच लाखांचे कर्ज मंजूर झाले असून ही रक्कम लवकरच तिच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगितले. 2 डिसेंबर 2024 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत या चौघांनी तिच्या कागदपत्रांवरुन विविध खाजगी अर्थपुरवठा करणार्या कंपनीकडून 1 लाख 9 हजार 536 रुपये घेतले होते, मात्र कर्जाची रक्कम तिला न देता त्यांनी कर्जाच्या पैशांचा परस्पर अपहार करुन तिची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने मालवणी पोलिसांना घडलेल प्रकार सांगून चौघांविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अनिल, अनिता, स्वाती आणि आवेश या चौघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच दोन दिवसांपूर्वी आवेश कुरेशी याला मालाड येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत फरार आरोपींची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.