मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 सप्टेंबर 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशातील बंगल्याच्या जागी हॉटेलच्या बांधकामासाठी वीस कोटीचे कर्ज मिळवून देतो असे सांगून कर्जासाठी घेतलेल्या 40 लाखांचा सहाजणांच्या एका टोळीने अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित सहाही आरोपीविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. इरफान अहमद शेख, अमोल पवार, तौफीक अहमद सैफुल्ला, रावसाहेब, संजीव मोहनलाल साह आणि राजकुमार सत्यप्रकाश गोस्वामी अशी या सहाजणांची नावे आहेत. या सर्वांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.
रफि अहमद अब्दुल हाई सिद्धीकी हे मूळचे उत्तरप्रदेशचच्या लखनऊ, सरोजिनीनगरचे रहिवाशी आहेत. त्यांच्या मालकीचे लखनऊ विमानतळावरच साडेतीन हजार स्केअर फुटाचा एक बंगला आहे. त्यांनी त्यांचा बंगला अनेक चित्रपटाच्या शूटींगसाठी भाड्याने दिला होता. त्यांचा बंगला विमानतळाच्या बाजूलाच असल्याने त्यांना बंगल्याचे रुपांतर हॉटेलमध्ये करायचे होते. त्यातून त्यांना फायदा होणार होता. त्यामुळे त्यांनी तिथे हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. याबाबत त्यांनी त्यांच्या काही मित्रांशी चर्चा केली होती. त्यातून त्यांच्या एका मित्राने अनिस नावाच्या व्यक्तीबाबत माहिती दिली होती. अनिसला संपर्क साधल्यानंतर त्याने तौफिक सैफुल्ला याचे नाव सुचविले, तोच त्यांना हॉटेलसाठी आर्थिक मदत मिळवून देईल असे सांगितले.
26 एप्रिल2025 रोजी ते बंगल्याचे कागदपत्रे घेऊन मुंबईत आले होते. यावेळी ते सहार येथील लिला इंटरनॅशनल हॉटेलमध्ये थांबले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी तौफिकला कॉल केला होता, त्याने त्यांना कुर्ला येथे बोलावून घेतले होते. तिथेच त्यांची संबंधित आरोपीशी ओळख झाली होती. यावेळी बंगल्याची पाहणी केल्यानंतर त्यांना 12 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन देताना त्यासाठी त्यांना कमिशन म्हणून 53 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी रफि सिद्धीकी यांनी होकार दर्शविला होता. या होकारानंतर त्यांनी सात दिवसांत त्यांचे कर्ज मंजूर करुन देतो असे सांगितले. त्यानंतर ते त्यांच्या गावी निघून गेले होते.
याच दरम्यान इरफान आणि अमोल यांनी संजीव या व्यक्तीला त्यांच्या गावी पाठविले होते. त्याने बंगल्याची पाहणी करुन बंगल्याचे कागदपत्रे घेतले. त्यानेही बंगल्यावर वीस कोटीचे कर्ज होईल असे सांगून इरफान आणि अमोलशी बोलून घ्या असे सांगितले. यावेळी त्यांनी वीसऐवजी बारा कोटीचे कर्ज देण्याची विनंती केली होती. याच कर्जासाठी त्यांनी आरोपींना टप्याटप्याने 40 लाख रुपये पाठविले होते. त्यापैकी 38 लाख कॅश तर दोन लाख आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर ते त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होते.
सात दिवसांत कर्ज देतो असे सांगून जवळपास एक महिना उलटूनही त्यांनी कर्ज मिळवून दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे कर्जासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली. मात्र त्यांनी त्यांना 40 लाख रुपये परत दिले नाही. या आरोपींकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी विनोबा भावे नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर इरफान शेख, अमोल पवाार, तौफिक सैफुल्ला, रावसाहेब, संजीव साह आणि राजकुमार गोस्वामी या सहाजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या सर्वांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.