कांदिवलीतील शाळेच्या ट्रस्टींना फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक

बोगस कागदपत्रे सादर करुन बँकेच्या अडीच कोटीचा अपहार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 सप्टेंबर 2025
मुंबई, – भाडेतत्त्वावर दिलेल्या शाळेच्या जागेवर एका खाजगी बँकेतून कर्ज घेऊन कर्जाच्या सुमारे अडीच कोटीचा अपहार केल्याप्रकरणी एसप्लेन्डे एज्युकेशन सोसायटीच्या दोन ट्रस्टींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. जयेश नवीनचंद्र मजिठिया आणि किर्ती वनमालिदास वैरी अशी या दोघांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांनी शाळेच्या जागेच्या बोगस दस्तावेजासह अध्यक्षासह सेक्रेटरी यांची बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून साडेचार कोटीचे कर्ज मंजूर करुन अडीच कोटीचा परस्पर अपहार करुन ट्रस्टसह बँकेची फसवणुक केल्याचा आरोप आहे.

मुस्तफा युसूफअली गोम हे व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतात. ते कांदिवलीतील एम. जी रोडवरील सैफी मशिदीत असलेल्या अंजुमन ए नाजमी दाऊदी ट्रस्टचे सेक्रेटरी म्हणून काम करतात. 1993 साली या ट्रस्टची स्थापना झाली असून तेव्हापासून ते तिथे सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. 30 वर्षांपूर्वी त्यांच्या ट्रस्टने मशिदीजवळील एसप्लेन्डे एज्युकेशन सोसायटीला शाळा चालविण्यासाठी ट्रस्टच्या मालकीची बोरा कॉलनीतील मथुरादास एक्सटेशन रोडवर जागा 97 वर्षांच्या कालावधीसाठी लिजवर दिली होती. त्यानंतर तिथे एसप्लेन्डे हायस्कूल ही शाळा सुरु झाली होती.

एप्रिल 2025 रोजी त्यांच्या कार्यालयात बँकेचे कर्जाच्या परतफेडीबाबत पत्र प्राप्त झाले होते. या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर संबंधित बँकेला त्यांच्या ट्रस्टच्या वतीने देण्यात आलेले एनओसीचे लेटर होते. ते लेटरहेड दहा वर्षापूर्वीचे होते. त्यात अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची स्वाक्षरी बोगस होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच ट्रस्टच्या फरीदा आरसीवाला हिने ते पत्र मुस्तफा गोम यांना पाठविले होते. तपासाअंती शाळेला फायनान्स आणिण सिव्हील वर्क करण्यासाठी संबंधित बँकेला त्यांच्या मालकीची शाळेची जागा तारण म्हणून ठेवली होती. त्यासाठी ट्रस्टच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांची बोगस स्वाक्षरीचे एनओसी देण्यात आले होते.

शाळेच्या वतीने जयेश मजिठिया आणि किर्ती वैरी यांनी बँकेत मार्गेज लोन मिळविण्यासाठी बोगस दस्तावेज सादर केले होते. या कागदपत्रानंतर बँकेच्या वतीने त्यांना साडेचार कोटी रुपयांचे कर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी सुमारे अडीच कोटींचा जयेश आणि किर्ती यांनी परस्पर अपहार करुन ट्रस्टची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच मुस्तफा गोम यांनी कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयेश मजिठिया आणि किर्ती वैरी या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावीेज सादर करुन बँकेतून घेतलेल्या अडीच कोटीचा परस्पर अपहार करुन ट्रस्टसह बँकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने या दोघांनी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांची ही याचिका विशेष सेशन कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर या दोघांनाही फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी ते बोगस दस्तावेज कधी आणि कुठे बनविले, याकामी त्यांना इतर कोणी मदत केली, बँकेच्या कर्जाच्या पैशांचा त्यांनी कशा प्रकारे विल्हेवाट लावली, ही रक्कम कुठे गुंतवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page