मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ जानेवारी २०२५
मुंबई, – व्यवसायासह गृहकर्जासाठी एका जिम ट्रेनर तरुणासह त्याच्या मित्राकडून घेतलेल्या ८ लाख ३७ हजाराचा अपहार करुन फसणुक केल्याप्रकरणी नितेश चंद्रकांत गुरव या २९ वर्षांच्या भामट्याविरुद्ध जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या नितेशचा पोलीस शोध घेत आहेत. त्याने अशाच प्रकारे इतर काहींची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
कौशिक सुरेश तांबिटकर हा तरुण जोगेश्वरीतील मजासवाडी, कमलाकुंज चाळीत राहत असून जीम ट्रेनर म्हणून काम करतो. पाच वर्षांपूर्वी तो जोगेश्वरी परिसरात एक व्यायामशाळा भाड्याने चालवत होता. २०२१ साली त्याला व्यायामशाळेच्या नूतनीकरणासाठी २५ ते ३० लाखांच्या कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान व्यायामशाळेत येणार्या नितेश गुरवशी त्याची मैत्री झाली होती. या कर्जाविषयी त्याने त्याच्याशी चर्चा केली होती. यावेळी नितेशने अंधेरीतील पाईपलाईन परिसरात त्याचे खाजगी कार्यालय असून त्याने अनेकांना व्यवसायासह प्रॉपटी, सीसी लोन मिळवून दिले आहे. त्यामुळे त्याला तो नक्की कर्ज मिळवून देईल असे सांगितले. कर्जासाठी कागदपत्रांसह लिगल आणि टेक्निकल काम करण्यासाठी त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्याचवर विश्वास ठेवून त्याने त्याव्या मित्राच्या मदतीने त्याला पैसे ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर तो त्याच्याकडे विविध कारणासाठी पैशांची मागणी करत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तो त्याला पैसे देत होता.
याच कर्जासाठी त्याने त्याला ३१ ऑगस्ट २०२१ ते १३ जुलै २०२२ या कालावधीत ५ लाख ५६ हजार ४०० रुपये दिले होते. ही रक्कम त्याने व्याजाने घेऊन त्याला दिले होते. व्याज देणे शक्य होत नसल्याने त्याची व्यायामशाळा बंद पडली होती. त्यामुळे त्याला व्याजासहीत मूळ रक्कम देणे कठीण जात होते. त्यामुळे तो नितेशकडे सतत कर्जाविषयी विचारणा करत होता. मात्र तो त्याला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून कर्जाचे काम होत नसल्याने त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्याला सहा लाखांचा एक धनादेश दिला होता, मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. याच दरम्यान कौशिकला नितेशने त्याचा मित्र मायकर व्हेलंटाईन मुदलीयार याला गृहकर्ज मिळवून देतो असे सांगितले. या गृहकर्जासाठी त्याने त्याच्याकडून २ लाख ८१ हजार रुपये घेतले होते. मात्र त्यालाही गृहकर्ज मिळवून दिले नव्हते.
अशा प्रकारे ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२३ या कालावधीत नितेशने या दोघांकडून व्यवसायासह गृहकर्जासाठी ८ लाख ३७ हजार ४०० रुपये घेतले, मात्र त्यांना कर्ज मिळवून न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच कौशिकने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितेश गुरवविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. २९ वर्षांचा नितेश हा जोगेश्वरीतील नटवरनगर रोड क्रमांक पाच, आनंद सहकारी सोसायटीमध्ये राहतो. त्याने अनेकांना कर्जाचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.