कर्ज देतो सांगून दोन व्यक्तींची पावणेदोन कोटीची फसवणुक
पंधराजणांविरुद्ध गुन्हा दाखल तर संचालिकेला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – शाळेच्या बांधकामासाठी संस्थेला तीस कोटीचे फंड तसेच घरासह कार्यालयाच्या बांधकाम कामासाठी कर्ज देतो सांगून दोन व्यक्तीची पंधराजणांच्या एका टोळीने सुमारे पावणेदोन कोटीची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गजानन सहकारी क्रेडिट सोसायटीच्या पंधरा संचालकासह इतर आरोपीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखच केला आहे. रजनी राजन देशपांडे, जितेंद्र कोकरेजा, सुशीम गायकवाड, पोपट मुळे, निकम पाटील, मोहम्मद अजीज, जयश्री भोज, अमीत मेहता, सुर्वण बरेकर, भारत बाबू रंगारे, आनंद स्वामी आणि इतर चौघांचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत क्रेडिट सोसायटीच्या संचालिका रजनी देशपांडे हिला बोरिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
राजकुमार अनिरुद्ध घाडगे हे मूळचे सोलापूरच्या पंढरपूर, देगांवचे रहिवाशी असून ते शेतकरी आहेत. त्यांची एक खाजगी संस्था असून या संस्थेची त्यांच्या गावात एक शाळा आहे. या शाळेच्या बांधकामासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. याच दरम्यान त्यांची रजनी देशपांडे यांच्यासह इतर आरोपीशी ओळख झाली होती. कांदिवलीतील चारकोप, सत्यानगर, शिवधाम शिवकृपा सोसायटीमध्ये गजानन सहकारी नावाची एक क्रेडिट सोसायटी असून तिथेच रजनीसह इतर आरोपी सभासद, प्रर्वतक आणि भागीदार म्हणून काम करत होते. त्यांनी त्यांना त्यांच्या शाळेच्या बांधकामासाठी तीस कोटीचे फंड मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. फंड मंजुरीसाठी त्यांनी त्यांच्याकडून ९४ लाख ७५ हजार रुपये घेतले होते. अशाच प्रकारे त्यांनी राजकुमार घोडगे यांचे परिचित वैभव कदम यांनाही त्यांच्या घरासह कार्यालयातील बांधकामासाठी चार कोटीचे कंजू मंजूर करुन देतो असे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून ८० लाख २५ हजार रुपये घेतले होते.
अशा प्रकारे या पंधराजणांनी या दोघांकडून शाळेच्या बांधकामासाठी तीस कोटीचे फंड आणि घरासह कार्यालयातील बांधकामासाठी चार कोटीचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून आतापर्यंत १ कोटी ७५ लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना फंड किंवा कर्ज मंजूर करुन दिले नाही. विचारणा केल्यानंतर ते सर्वजण त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. या आरोपींकडून आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रार अर्जाची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी रजनी देशपांडे यांच्यासह इतर चौघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रजनी ही पोलीस ठाण्यात चौकशीकामी आली होती. चौकशीनंतर या गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला रविवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.