शेतीवर कर्ज देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक
बँक कर्मचार्यासह महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – शेतीवर कर्ज देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी उर्मिला उमेश गोरविले आणि राकेश या दोघांविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील उर्मिला या कटातील मुख्य आरोपी असून राकेश हा एका नामांकित बँकेचा कर्मचारी आहे. या दोघांनी कर्जासाठी प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी पावणेतेरा लाख रुपये घेऊन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
चंदन शंकर गुप्ता हे मालाड परिसरात राहतात. त्यांचा स्वतचा व्यवसाय असून त्यांची रत्नागिरीच्या दोपोली गावी मोठी शेती आहे. त्यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत उर्मिला गोरविले हिच्याशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान तिने त्यांना कर्जाविषयी माहिती दिली होती. त्यांच्या शेतीवर कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे काही खाजगी बँकेत चांगली ओळख असून या बँकेतून त्यांना कर्ज देणार असल्याचे सांगितले. यावेळी तिने एका बँकेतील कर्मचारी असलेल्या राकेशशी त्यांची ओळख करुन दिली होती. तोच त्यांना त्यांच्या शेतीवर कर्ज मिळवून देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे कर्जासाठी अर्ज केला होता.
याच कर्जासाठी त्यांनी तिला प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी 12 लाख 77 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत तिने त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. वारंवार विचारणा करुनही या दोघांकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. विविध कारण सांगून ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उर्मिला गोरविले आणि राकेश यांच्याविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. यातील राकेश एका नामांकित बँकेतील कर्मचार असून त्याने उर्मिलासोबत अशाच प्रकारे काहींना कर्जाचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.