मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या समित ज्ञानेश्वर गोंदके यांचा भांडुप-नाहून रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. बुधवारी पडणार्या मुसळधार पावसामुळे तसेच लोकलमध्ये झालेल्या गर्दीमुळे त्यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. समित यांच्या अपघाती मृत्यूचे समजताच पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे.
समीत गोंदके हे डोबिवलीतील रहिवाशी असून सध्या अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ते ड्यूटी संपवून त्याच्या डोबिवली येथील घरी जाण्यासाठी निघाले होते. अंधेरी-घाटकोपर असा मेट्रोने प्रवास केल्यानंतर ते लोकलने प्रवास करत होते. यावेळी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान त्याचा तोल गेला आणि ते चालत्या लोकलमधून खाली पडले. रेल्वेतून पडल्याने त्यांचा एक हात खांद्यापासून तुटून वेगळा झाला होता. तसेच त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कवटी फुटून अंगावर अनेक खरचटल्याच्या जखमा झाल्या होत्या. रात्रभर ते तिथे जखमी अवस्थेत पडले होते. त्यात बुधवारी पडणार्या मुसळधार पावसामुळे त्यांची प्रकृती जास्त चिंताजनक झाली होती. ही माहिती सकाळी सात वाजता एका प्रवाशांकडून कुर्ला रेल्वे पोलिसांना देण्यात आली होती. ही माहिती मिळतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या समीत यांना तातडीने मुलुंडच्या अग्रवाल या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते.
त्यांच्याकडील मिळालेल्या ओळखपत्रासह गणवेशामुळे त्यांची ओळख पटली होती. बुधवारी मुसळधार पाऊस पडत असल्याने रात्री उशिरा घरी जाणार्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यात समीत हे गर्दीत लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करत होते. यावेळी त्यांचा तोल गेला आणि ते लोकलमधून खाली पडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. समित हे २०१८ साली पोलीस खात्यात भरती झाले होते. सध्या ते अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते, अनेकांना मदत करण्यासाठी ते प्रयत्नशील राहत होते. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबियासह नातेवाईक, मित्रमंडळी आदींचा प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.