मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ मार्च २०२४
मुंबई, – प्रवासादरम्यान गर्दी असल्याचा फायदा घेऊन एका सतरा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करुन एका प्रवाशाने तिचा विनयभंग केल्याची घटना बोरिवली रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन बोरिवली रेल्वे पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता बोरिवली रेल्वे स्थानक फलाट क्रमांक पाचवर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सतरा वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या कुटुंबियांसोबत मालाड येथे राहते. सोमवारी ती तिच्या भावासोबत कामानिमित्त विरार येथे गेली होती. रात्री ते दोघेही विरारहून बोरिवलीच्या दिशेने येत होते. यावेळी लोकलमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवाशाने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता, सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र या आरोपीने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले होते. त्यामुळे तिने तिच्या भावाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर या दोघांनी इतर प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडून तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध रेल्वे पोलिसांनी ३५४, ३५४ (अ), भादवीसह ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. या वृत्ताला प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी दुजोरा देताना आरोपीला अटक झाली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे सांगितले.