तरुणीचा विनयभंग करणार्या प्रवाशाला अटक
वांद्रे-अंधेरी लोकल प्रवासादरम्यानची घटना
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – मित्रासोबत गोरेगाव लोकलने प्रवास करणार्या एका तरुणीचा गर्दीचा फायदा घेऊन दोन वेळा अश्लील स्पर्श करुन विनयभंग केल्याप्रकरणी श्रवणकुमार विश्वकर्मा नावाच्या एका प्रवाशाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर कोर्टाने जामिनावर सुटका केली. ही घटना सोमवारी रात्री वांद्रे-अंधेरी लोकल प्रवासादरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
२५ वर्षांची तक्रारदार तरुणी ही गोरेगाव परिसरात राहते. सोमवारी रात्री ती तिच्या मित्रासोबत होती. वांद्रे रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांनी गोरेगाव लोकल पकडली होती. यावेळी लोकलमध्ये गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवाशाने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिला नकोसा स्पर्श केला होता. गर्दीमुळे चुकून हात लागला असावा म्हणून तिने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र या प्रवाशाने पुन्हा तिला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तिने हा प्रकार तिच्या मित्राला सांगितला. त्याने त्याला जाब विचारुन पुढच्या रेल्वे स्थानकात जबदस्तीने उतरविले. हा प्रकार तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत आरोपीचे नाव श्रवणकुमार विश्वकर्मा असल्याचे उघडकीस आले. या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन वांद्रे रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३५४ अ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली.