मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 सप्टेंबर 2025
मुंबई, – कल्याणच्या दिशेने जाणार्या उपनगरीय लोकलच्या डब्ब्यात गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार दादर रेल्वे स्थानकात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच दिल्लीचा रहिवाशी असलेल्या दर्शनकुमार गिरीधारीलाल माखन नावाच्या एका 62 वर्षांच्या वयोवृद्धाला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम यांनी दुजोरा दिला, मात्र अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.
ही घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर रेल्वे स्थानकादरम्यान जलदगतीच्या उपनगरीय लोकलमध्ये घडली. शनिवारी दुपारी तक्रारदार महिला ही तिच्या मित्रासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणला जाणार्या जलदगतीच्या उपनगरीय लोकलमधून प्रवास करत होती. यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती, त्यातून ती तिच्या मित्रासोबत एका बाजूला उभी राहून प्रवास करत होती. याच दरम्यान तिच्या मागे उभ्या असलेल्या व्यक्तीने तिच्या कमरेला नकोसा स्पर्श करुन तिला सीटला पाठीमागून जोरात दाबण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घडलेला प्रकार तिच्या मित्राला सांगितला. ही लोकल दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक बाराजवळ येताच त्यांनी घडलेला तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. या घटनेनंतर पोलिसांनी विनयभंग करणार्या वयोवृद्धाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला पोलीस ठाण्यात आणले. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दर्शनकुमार माखन या 62 वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीस पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. दर्शनकुमार हा वेस्ट दिल्लीतील उत्तमनगर, गोवर्धन पार्कच्या जी/314 चा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्दीचा फायदा घेऊन त्याने या महिलेशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने रेल्वे स्थानकातील महिला वर्गात प्रचंड संतापाची लाट उसळली होती.