बँक कर्मचार्याकडून डिलीव्हरी बॉयवर एअर गनने गोळीबार
गुन्हा दाखल होताच बँक कर्मचार्यावर अटकेची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – बेल वाजविण्यासह औषधांवरुन झालेल्या वादातून एका बँक कर्मचार्याने औषधांची डिलीव्हरीसाठी आलेल्या डिलीव्हरी बॉयवर एअर गनने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना लोअर परेल परिसरात घडली. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, मात्र गोळीबाराच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी बँक कर्मचारी सौरभकुमार अविनाशकुमार सिंग याला एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार करणे सौरभकुमारला चांगलेच महागात पडले आहे.
ही घटना लोअरपरळ येथील ना. म जोशी मार्ग, नित्यानंद कॉलनीत घडली. या कॉलनीतील कॉटन ग्रीन इमारतीच्या आठव्या मजल्यावर सौरभकुमार हा राहत त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. सध्या तो एका बँकेत कामाला आहे. शुक्रवारी रात्री त्याने एका ऑनलाईन औषध वितरण अॅपवरुन काही औषधांची ऑर्डर दिली होती. काही वेळानंतर तक्रारदार सतरा वर्षांचा डिलीव्हरी बॉय त्याच्या घरी औषध घेऊन आला होता. त्याने त्याच्या दरवाज्याची बेल वाजविली, मात्र सौरभकुमारने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्याने पुन्हा दोन-तीन वेळा बेल वाजविली होती.
याच कारणावरुन सौरभकुमारचे त्याच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याने आणलेले औषध कमी आणि चुकीचे होते, त्यामुळे त्याने त्याला पूर्ण पैसे देण्यास नकार दिला होता. याच कारणवरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. रागाच्या भरात सौरभकुमार हा आत गेला आणि त्याने त्याच्याकडील एअरगनवरुन हवेत गोळीबार केला होता. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नाही. मात्र अचानक गोळीबाराचा आवाज आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबाराची माहिती मिळताच एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी डिलीव्हरी बॉयची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीवरुन घडलेला प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी बँक कर्मचारी असलेल्या सौरभकुमार सिंग याला अटक केली. त्याच्याकडून त्याची एअरगन पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही गन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात सौरभकुमारने दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला होता, मात्र गोळीबार करणे त्याच्या चांगलेच अंगलट आल्याचे बोलले जाते.