गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची २० कोटीची फसवणुक
काळबादेवीतील घटना; पुण्याच्या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सुमारे २० कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या दोन भामट्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चांगला परतावा देण्याच्या आमिषाला बळी पडून तक्रारदार व्यावसायिकाने या दोघांना व्यवसायासाठी पैसे दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दिलीप ढोरे आणि शरद ढोरे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे पुण्यातील शिवाजीनगर रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांच्या तपासकामी एल. टी मार्ग पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच पुण्याला जाणार आहे.
५२ वर्षांचे तक्रारदार मोहम्मद युसूफ सुलेमान अन्सारी हे जे. जे मार्ग परिसरात राहत असून त्यांचा जुन्या बाईकच्या स्पेअर पार्टसचा व्यवसाय आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांची दिलीप आणि शरद ढोरे यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना त्यांच्या व्यवसायात गुंतवणुकीची ऑफर दिली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. यासंदर्भात त्यांची एल. टी मार्ग येथील बावर्ची हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीत त्यांच्यात व्यवसायसंदर्भात सविस्तर चर्चा झाली होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी या दोन्ही आरोपींना एप्रिल २००५ ते जुलै २०१६ या कालावधीत सुमारे वीस कोटी रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना परतावा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा व्यवहार पसंद न पडल्याने त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम परत मागितली होती. मात्र त्यांनी ही रक्कम परत न करता त्याचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती.
गेल्या आठ वर्षांपासून ते पैसे मिळतील या आशेने त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. मात्र या दोघांकडून पैसे मिळण्याची कुठलीही शक्यता नसल्याने अखेर त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शरद ढोरे आणि दिलीप ढोरे यांच्याविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील हे करत आहेत. लवकरच पोलिसांचे एक पथक पुण्याला जाणार आहे. या दोघांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले.