मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१० फेब्रुवारी २०२५
मुंबई, – सोन्याचे मंगळसूत्र बनविण्यासाठी दिलेल्या १ कोटी ३० लाख रुपयांच्या १४९७ ग्रॅम वजनाच्या शुद्ध सोन्याचा कारागिराने अपहार करुन पलायन केल्याची घटना झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मीर आरिफ गुलाम या कारागिराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या मीरच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
केदार कृष्णा मामडे हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत काळाचौकी येथे राहतात. त्यांचा सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. झव्हेरी बाजार येथील पहिली अग्यारी लेन, डी डी ज्वेलर्स इमारतीमध्ये त्यांच्या मालकीचा कनक स्पर्श ज्वेल्स नावाचे एक शॉप आहे. मीर गुलाम हा त्यांच्या परिचित कारागिर असून ते त्याला सोन्याचे दागिने बनविण्यासाठी देत होते. ८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत त्यांनी मीर गुलाम याला सोन्याचे मंगळसूत्र बनविण्यासाठी एक कोटी तीस लाख रुपयांचे १४९७ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने दिले होते. दहा ते पंधरा दिवसांत सोन्याचे दागिने बनवून देतो असे त्याने त्यांना सांगितले.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने मंगळसूत्र बनवून दिले नाही. मंगळसूत्र बनविण्यासाठी दिलेले शुद्ध सोने घेऊन तो कारखान्यातून पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. मीर गुलाम पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मीर गुलामविरुद्ध पोलिसांनी सोन्याचे मंगसूत्र बनविण्यासाठी दिलेल्या शुद्ध सोन्याचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तो त्याच्या गावी गेल्याची शक्यता असल्याने एक टिम लवकरच त्याच्या गावी जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.