चांगला परतावा देतो असे सांगून कापड व्यापार्याची फसवणुक
2.88 कोटीच्या अपहारप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 ऑगस्ट 2025
मुंबई, – भुलेश्वर परिसरातील एका खाजगी कंपनीत गुंतवणुक केल्यास पाच ते वीस टक्के परतावा देण्याचे आमि दाखवून गुजरातच्या एका कापड व्यापार्याची पाचजणांच्या टोळीने फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या पाचही संचालकासह इतर पदाधिकार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनिलकुमार शंकरलाल, ललित ऊर्फ नंदीद मेहता, अनुजा भाई, जॅनी फ्रान्ससीस आणि सुवर्णा अशी या पाचजणांची नावे आहेत. ते सर्वजण पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
दर्शन कमलेशकुमार शहा हे कापड व्यापारी असून ते सध्या गुजरातच्या अहमदाबाद, साबरमती, रामबाग रोडच्या सत्यनारायण सोसायटीमध्ये राहतात. नोव्हेंबर 2023 रोजी त्यांची अनिलकुमारशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. अनिलकुमारने त्याची भुलेश्वर येथील रिफायनरी इमारतीमध्ये अॅक्वावायू एलिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असल्याचे सांगितले. याच कंपनीत त्याचे इतर सहकारी काम करत होते. कंपनीच्या वाढीसाठी त्यांना काही गुंतवणुकदारांची गरज आहे, कंपनीत गुंतवणुक केल्यास त्यांना पाच ते वीस टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या कंपनीत 2 कोटी 88 लाख 15 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती.
ही रक्कम ऑगस्ट नोव्हेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. या पेमेंटनंतर त्यांच्यात कायदेशीर करार झाला होता. मात्र कराराप्रमाणे आरोपींनी त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. गेल्या दोन वर्षांपासून ते त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते. मात्र पाचही आरोपी त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचे प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुक केलेली रक्कम परत मागितली होती, मात्र त्यांनी त्यांना पैसे परत केले नाही.
चांगला परवाता देतो असे सांगून पाचही आरोपींनी त्यांना त्यांच्या कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पाचही आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अनिलकुमार शंकरलाल, ललित ऊर्फ नंदीद मेहता, अनुजा भाई, जॅनी फ्रान्ससीस आणि सुवर्णा या पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पाचजणांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.