नवग्रह खड्यांच्या पेमेंट अपहार करुन व्यापार्याची फसवणुक
46 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑगस्ट 2025
मुंबई, – नवग्रह खड्यांच्या सुमारे 46 लाख रुपयांचा अपहार करुन एका व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजकुमार जैन या आरोपी व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या व्यापार्याचा शोध सुरु केला आहे. राजकुमारने अशाच प्रकारे इतर व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
राजेश रामवतार खांडेवाल हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांचा नवग्रह खडे विक्रीचा व्यवसाय असून ते झव्हेरी बाजारसह इतर व्यापार्यांना होलसेलमध्ये खड्यांची विक्री करतात. दहा वर्षांपूर्वी त्यांची राजकुमार जैनशी ओळख झाली होती. त्याने तो दिल्लीचा रहिवाशी असून त्याचाही नवग्रह खडे विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्यांच्याकडून राजकुमारने अनेकदा नवग्रह खडे विक्रीसाठी घेतले होते. त्याचे वेळेवर पेमेंट करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता.
एप्रिल ते ऑगस्ट 2015 या कालावधीत त्यांनी त्यांच्याकडून 1 कोटी 32 लाख 46 हजार रुपयांचे विविध प्रकारचे नवग्रह खडे क्रेडिटवर घेतले होते. जून 2015 ते जून 2016 या कालावधीत त्यांनी त्यांना 85 लाख 57 हजार रुपयांचे पेमेंट दिले होते. मात्र त्याच्याकडून उर्वरित 46 लाख 89 हजार रुपयांचे पेमेंट येत नव्हते. वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.
क्रेडिटवर घेतलेल्या नवग्रह खड्याचा अपहार करुन त्याच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजकुमार जैनविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.