मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – मद्यप्राशन करुन एका २७ वर्षांच्या वकिल तरुणीची तिच्याच मित्राने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना ठाकूरद्वार परिसरात घडली. याप्रकरणी अंगत सहदेवा या आरोपी मित्राविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
२७ वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या कुटुंबियांसोबत ठाकूरद्वार परिसरात राहते. तिच्या वडिलांचा झव्हेरी बाजार येथे चांदीचा व्यवसाय आहे तर ती कार्पोरेट वकिल म्हणून काम करते. ५ ऑक्टोंबर २०२४ रोजी ती नेपाळच्या संधकफु येथे ट्रेकसाठी गेली होती. तिथेच तिची अंगतशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. अंगत हा अंधेरीतील लोखंडवाला संकुल परिसरात राहत असून एका नामांकित बँकेत कामाला आहे. नेपाळहून मुंबईत आल्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा ते जेवणासह कॉफीसाठी भेटत होते.
२१ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता ती तिच्या मैत्रिणीसोबत अंगतच्या अंधेरीतील राहत्या घरी पार्टीसाठी आले होते. तिथे पार्टी केल्यानंतर ती अंगत आणि तिच्या एका मैत्रिणीसोबत वांद्रे येथे गेली होती. तिथे त्यांना मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्याने त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते तिघेही तक्रादार तरुणीच्या घराजवळ आले होते. या तिघांनी मद्यप्राशन केले होते. त्यामुळे अंगतने तिच्या घरी थोड्या वेळासाठी थांबण्याची परवानगी मागितली होती. तिनेही त्याला होकार दिला होता.
घरी आल्यानंतर तिची मैत्रिण एका रुममध्ये गेली आणि ती अंगतसोबत तिच्या रुममध्ये होती. जास्त मद्यप्राशन केल्यानंतर तिला झोप येत होती. त्याचाच गैरफायदा घेऊन अंगतने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करताना त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करु लागला. या प्रकारानंतर तिला प्रचंड धक्का बसला होता. त्यामुळे तिने त्याला घरातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर तो त्याच्या घरी निघून गेले. त्यानंतर त्याने तिला कॉल करुन पार्टीत झालेल्या खर्चाचा हिशोब सांगून तिच्याकडे पैशांची मागणी केली.
या घटनेनंतर तिने एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अंगतविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत अंगतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.