मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बॅगेतून हिरेजडीत दागिन्यांची चोरी करुन पलायन केलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस मुद्देमालासह एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. मकसूद ऊर्फ अरबाज किस्मत मंसुरी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा बहुतांश हिरेजडीत दागिने हस्तगत करणत पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार व्यापारी असून त्यांच्या मालकीचे पायधुनी परिसरात सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. ते व्यापार्यांच्या ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून देतात. २१ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता ते ऑपेरा हाऊस येथील जिया ज्वेलर्सचे डिंपल शहा यांच्याकडून काही हिरेजडीत दागिने घेऊन जात होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅगेतून ५ लाख ६१ हजार रुपयांचे हिरेजडीत दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांत मकसूद मंसुरीचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर एपीआय राहुल भंडारे, पोलीस उपनिरीक्षक रुपेश पाटील व अन्य पोलीस पथकाने मकसूदला टिटवाळा येथून अटक केली. चौकशीत त्यानेच हिरेजडीत दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे ५ लाख ५१ हजार रुपयांचे हिरेजडीत दागिने हस्तगत केले आहेत. पोलीस कोठडीनंतर त्याला शनिवारी किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.