मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या पोलीस गस्तदरम्यान काळबादेवीतील भुलेश्वर मार्केट परिसरात एल. टी मार्ग पोलिसांनी निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाने २ कोटी ३२ लाखांची कॅश जप्त केली आहे. याच प्रकरणात बाराजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांचा ताबा आयकर विभागाकडे सोपविला आहे. या बाराजणांची सध्या आयकर विभागाकडून चौकशी आहे. जप्त केलेली कॅश कोणाची आहे, ही कॅश कुठल्या कारणासाठी घेऊन जात होते याचा आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरातून स्थानिक पोलिसांसह निवडणुक आयोगाच्या भरारी पथकाने कोट्यवधी रुपयांची कॅश जप्त केली होती. निवडणुक काळात मोठ्या प्रमाणाात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा वापर होत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अघिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना परिसरात जास्तीत जास्त गस्त आणि नाकाबंदीचे आदेश दिले आहे. संशयित वाहनांची तपासणी करुन चालकाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. गुरुवारी एल. टी मार्ग पोलिसांचे पथक भुलेश्वर मार्केट परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांनी बारा संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना २ कोटी ३२ लाखांची कॅश सापडली. ही माहिती नंतर निवडणुक आयोगाच्या भरारी पथकासह आयकर विभागाला देण्यात आली होती.
या कॅशसहीत बाराजणांना पुढील चौकशीसाठी आयकर विभागाकडे सोपविण्यात आले होते. या सर्वांची सध्या चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेले सर्व संशयित अंगाडियाकडे कामाला असून त्यांच्याकडे सापडलेली कॅश हवालाची असल्याचे बोलले जाते. मात्र पोलिसांकडून याबाबत काहीही अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ही कॅश कोणाची आहे, ती कोणाला देण्यासाठी संबंधित जात होते. या पैशांचा निवडणुकीसाठी वापर होणार होता का याचा आयकर विभागाकडून तपास सुरु आहे.