मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2025
मुंबई, – फुटपाथवर अधिकृतपणे वास्तव्य करणार्यांविरुद्ध कारवाई करताना एकाच कुटुंबातील तिघांनी पोलीस हवालदार विजय मारुती भिंगारदिवे यांना शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी चंदनवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात विजय भिंगारदिवे यांना दुखापत झाली होती. याप्रकरणी शासकीय कर्मचार्याला कर्तव्य बजाविताना शिवीगाळ करुन मारहाण केल्याप्रकणी तिघांना एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. सोनू विजय मनोडिया, विजय वल्लभ मनोडिया आणि सनी वल्लभ मनोडिया अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
विजय भिंगारदिवे हे बीडीडी चाळीत राहत असून एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. फुटपाथवर राहणार्या बेगारींवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी वरिष्ठांकडून सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते. त्यामुळे एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक मरिनलाईन्स येथील चंदनवाडी, बीएमसी शाळेजवळ कारवाई करत होते. तिथे कारवाई सुरु असताना सोनू या महिलेसह विजय आणि सनी यांनी पोलीस हवालदार विजय भिंगारदिवे यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. तसेच त्यांना कारवाईपासून रोखून त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी ही कारवाई सुरुच ठेवल्याने रागाच्या भरात या तिघांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना हाताने आणि लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. त्यात त्यांना दुखापत झाली होती.
ही माहिती मिळताच तिथे अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी धाव घेतली होती. यावेळी पोलीस हवालदार विजय भिंगारदिवे यांच्यावर हल्ला करणार्या सोनू मनोडिया, विजय मनोडिया आणि सनी मनोडिया या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करत आहेत.