मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – चोरीसह रॉबरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील आरोपीस एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. इरफान अश्रमअली शेख असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध पायधुनी आणि एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
सुधीर विठ्ठलदास कापाडिया हे 78 वर्षांचे वयोवृद्ध त्यांची पत्नी सोनल हिच्यासोबत काळबादेवी रोड, पोपटवाडीत राहतात. ते महालक्ष्मी रेसकोर्समध्ये कामाला होते. 20 वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले असून नोकरीतून मिळणार्या उत्पनातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 28 फेब्रुवारी त्यांच्या घरात एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन त्यांचा मोबाईलसह तीस हजाराची कॅश चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे, पोलीस हवालदार परुळेकर, राऊत, साटम, कुंभार, पोलीस शिपाई सातपुते, साळुंखे, शिंदे, जोशी यांनी इरफान शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली.
इरफान हा वाडीबंदर येथील पूना स्ट्रिट परिसरात राहत असून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध एल. टी मार्ग आणि पायधुनी पोलिसांत सातहून अधिक चोरीसह रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा चोर्या आणि रॉबरी करत होता. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.