मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 मार्च 2025
मुंबई, – समलैगिंकदरम्यान बेशुद्ध पडलेल्या 55 वर्षांच्या व्यक्तीला रुग्णालयात न नेता त्याच्याकडील मोबाईल चोरी करुन पळून गेलेल्या मित्राविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत व्यक्ती हा काळबादेवी परिसरात राहतो. तो समलैगिंक संबंध ठेवत होता. 14 फेब्रुवारीला त्याने त्याच्या एका मित्राला घरी बोलाविले होते. यावेळी त्यांच्यात समलैगिंक संबंध सुरु असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. यावेळी त्याचा मित्र त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन न जाता त्याच्याकडील दोन्ही मोबाईल घेऊन पळून गेला होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला जवळच्या जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. वेळीच औषधोपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून समजताच एल. टी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी एडीआरची नोंद करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कांबळे यांनी तपास ुसरु केला होता.
तपासादरम्यान हा प्रकार उघडकीस आला होता. मृत व्यक्ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तातडीने औषधोपचारासाठी आरोपी मित्राने हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता तो त्याचे दोन्ही मोबाईल चोरी करुन त्याच्या घरातून पळून गेला होता. त्यात त्याने हलगर्जीपणा केला होता, त्याच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाला होता. तपासाचा हा अहवाल नंतर वरिष्ठांना देण्यात आला होता. वरिष्ठांच्या आदेशानंतर 34 वर्षांच्या आरोपी मित्राविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.