मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – मालकाने विश्वासाने दिलेल्या सुमारे साडेपंधरा लाखांचा अपहार करुन एका नोकराने पलायन केल्याची घटना उघडकीस आली. करण विजय सिंग असे या नोकराचे नाव असून एकाच वेळेस इतके पैसे पाहून लालच निर्माण झाली आणि कॅश घेऊन तो गावी पळून गेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी करण सिंगविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
जयेशकुमार भिखाभाई पटेल यांचा रियल इस्टेटसह फायनान्सचा व्यवसाय आहे. भुलेश्वर येथे त्यांची विश्वा इंटरप्रायजेस नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. त्यांच्याकडे करण सिंग हा कामाला असून 4 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी त्याला कंपनीची सुमारे तीस लाखांची कॅश दिली होती. त्याने ती रक्कम कंपनीतील लॉकरमध्ये ठेवली होती. तीन दिवसांनी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे पैसे काढण्यासाठी लॉकर उघडले असता त्यात कॅश नव्हती. त्यामुळे त्यांनी करणला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता.
करण हा मध्यप्रदेशच्या मोरेना, रामनगरच्या हकीमसिंग बघेलवाली गल्ली गावचा रहिवाशी होता, तो गावी पळून गेल्याची माहिती मिळताच जयेशकुमार हे त्याच्या गावी गेले होते. तिथे त्याला करण सिंग भेटला. त्याने तीस लाख पाहून त्याला लालच निर्माण झाली, त्यामुळे तो कॅश घेऊन गावी आल्याचे सांगितले. याकामी त्याला अमन तिवारी याने मदत केली होती. अपहार केलेल्या तीसपैकी साडेचौदा लाख रुपये त्याने त्यांना परत केले. उर्वरित कॅश त्याने त्याचे दोन मित्र अमन सुनिल तिवारी आणि त्याचा भाऊ विक्की तिवारी यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती. ते दोघेही सध्या कुठे आहेत याची माहिती त्याला नव्हती.
हा प्रकार उघडकीस येताच मुंबईत आल्यानंतर जयेशकुमार पटेल यांनी करण सिंग याच्याविरुद्ध विश्वासाने कार्यालयातील साडेपंधरा लाखांच्या कॅशचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.