मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 सप्टेंबर 2025
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरी करणार्या मशिन टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत टोळीच्या मुख्य आरोपीसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत प्रविणचंद्र दामाणी, मोहम्मद इजहार अबरार बेग, पंकज महादेव गायकवाड आणि मोहम्मद शमीम जाहिद अन्सारी अशी या चौघांची नावे असून ते चौघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांची मशिन नावाची एक टोळी असून ही टोळी गर्दीचा फायदा घेऊन बेस्टमध्ये चोरी करत असल्याचे उघडकीस आले आहे. श्रीकांत हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात राज्यात पंधराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील गुन्ह्यांतील मोबाईलसह रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विकास प्रेमचंद्र कनोजिया हा अंधेरीतील जेव्हीएलआर रोड, दुर्गानगरचा रहिवाशी आहे. तो सध्या एका कार कंपनीत कामाला आहे. 26 ऑगस्टला सकाळी नऊ वाजता तो नमस्कार बसस्टॉप, दुर्गानगर येथून कामावर जाण्यासाठी बसमध्ये चढला होता. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये प्रचंड गर्दी होती, याच गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने त्याचा 32 हजार रुपयांचा विवो कंपनीचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. बसमधून उतरल्यानंतर त्याला मोबाईल चोरी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध मोबाईल चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
गर्दीचा फायदा घेऊन बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरी करणार्या काही टोळ्या असल्याने, या टोळीने अनेक प्रवाशांचे मोबाईल चोरी केल्याने त्याची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस हवालदार नलावडे, माळी, पोलीस शिपाई जाधव, पवार, जगताप यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. याच फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन हा गुन्हा मशिन नावाच्या टोळीने केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने आकुर्ली मेट्रो स्टेशनसह वांद्रे येथील निर्मलनगर परिसरातून श्रीकांत दामाणी, मोहम्मद इजहार बेग, पंकज गायकवाड आणि मोहम्मद शमीम अन्सारी या चौघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
बेस्टमध्ये गर्दी फायदा घेऊन मोबाईल, पाकिटमारी करणारी ही मशिन नावाची टोळी असून या टोळीचा श्रीकांत हा मुख्य आरोपी आहे. श्रीकांतविरुद्ध सुरत रेल्वे पोलीस ठाण्यात तीन, दिडोंशी, बोरिवली, पायधुनी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, भायखळा, मेघवाडी, वलसाड रेल्वे पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा पंधरा, इजहारविरुद्ध बोरिवली, पार्कसाईट, वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात तीन, पंकजविरुद्ध पवई, साकिनाका, ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील मोबाईलसह रिक्षा असा 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चौघांच्या अटकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.