कारच्या धडकेने चौदा वर्षांच्या दोन मुली गंभीररीत्या जखमी
महालक्ष्मी मंदिराजवळील अपघात; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – दुकानात जाण्यासाठी रस्ता क्रॉस करणार्या चौदा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना भरवेगात जाणार्या एका कारने धडक दिली. या अपघातात त्या दोघीही गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऐशानी जाधव आणि जान्हवी कनोजिया अशी या दोघींची नावे आहेत. अपघातानंतर कारचालक दोघींनाही कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला आहे. त्यामुळे या कारचालकाविरुद्ध गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजता महालक्ष्मी मंदिराजवळील रस्त्यावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ऐशानी आणि जान्हवी या दोघीही चौदा वर्षांच्या असून त्या महालक्ष्मी मंदिर संकुल वसाहतीत राहतात. याच परिसरात असलेल्या एका खाजगी शाळेत त्या दोघीही दहावीत शिकतात. शुक्रवारी दुपारी तीन वाजता दुकानातून काही वस्तू खरेदीसाठी त्या दोघीही जात होत्या. रस्ता क्रॉस करताना अचानक भरवेगात जाणार्या एका कारने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला होता. स्थानिक लोकांकडून ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दोघींनाही पोलिसांनी तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरुन गावदेवी पोलिसांनी पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळीचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजमध्ये एका भरवेगात जाणार्या कारने या दोन्ही मुलींना धडक दिल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावर पडण्यापूर्वी त्या दोघीही हवेत उंच फेकल्या गेल्या होत्या.