मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मे 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका बाईकच्या धडकेने अब्दुल रहिम गुलाम हुसैन सुरती या 72 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बाईकस्वार फैजान फेजुल शेख याला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
हा अपघात शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता माहीम येथील बोलमिया लेन, आर. सी माहीम स्कूलजवळील खान हाऊससमोर झाला. मोहसीना फैजान सुरती ही महिला तिचे सासरे अब्दुल रहिम, पती फैजान, आणि सात वर्षांचा मुलगा फिजेन याच्यासोबत माहीम येथील काळा बंगलासमोरीलल सियापोसवाडीत राहते. ती ब्युटीशियन म्हणून काम करते तर तिचे पती फुड डिलीव्हरीचे काम करतात. मृत अब्दुल रहिम सुरती हे तिचे वयोवृद्ध सासरे आहेत. शनिवारी ती तिच्या मुलासोबत माहेरी आली होती. यावेळी तिचे सासरे अब्दुल रहिम हे आर. सी माहीम स्कूलजवळून खान हाऊससमोरुन पायी चालत येत होते.
याच दरम्यान भरवेगात जाणार्या एका बाईकस्वाराने त्यांना जोरात धडक दिली होती. या अपघातात अब्दुल रहिम हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला, तोंडाला, हाता-पायांना गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार निदर्शनास येताच तिने घटनास्थळी धाव घेऊन तिच्या सासर्यांना तातडीने टॅक्सीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर आरोपी बाईकस्वाराला स्थानिक रहिवाशांनी ताब्यात घेतले होते. अपघाताची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी या रहिवाशांनी आरोपी बाईकस्वाराला पोलिसांच्या स्वाधीन केले.
चौकशीदरम्यान त्याचे नाव फैजान शेख असल्याचे उघडकीस आले. तो गोवंडीतील टाटानगर, पाचनल अपार्टमेंटचा रहिवाशी आहे. याप्रकरणी मोहसीना सुरती हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फैजानविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून तिच्या वयोवृद्ध सासर्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याला नंतर जामिनावर सोडून देण्यात आले.