मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 एप्रिल 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरची स्कूटरला धडक लागून झालेल्या अपघातात गणेश धनराज मुदलीयार या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना माहीम परिसरात घडली. अपघातानंतर पळून गेलेला डंपरचालकाने माहीम पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. याप्रकरणी माहीम पोलिसांनी अपघाताची नोंद करुन डंपरचालक धर्मेंद्र राजकुमार प्रजापती याला अटक केली होती. त्याच्यावर हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात मंगळवारी रात्री दहा वाजता माहीम येथील रेहजा हॉस्पिटलजवळ झाला. धनराज कन्नन मुदलीयार हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसोबत धारावी परिसरात राहतात. गणेश हा त्यांचा लहान मुगा असून त्याने शिक्षण सोडले होते. शिक्षण सुटल्यानंतर तो शिवडी येथील एका कपड्याच्या दुकानात कामाला लागला होता. 31 मार्चला त्यांना सायन हॉस्पिटलमधून एक कॉल आला होता. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांचा मुलगा गणेशचा अपघात झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. त्यामुळे धनराज मुदलीयार हे सायन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना गणेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले.
चौकशीदरम्यान त्यांचा मुलगा गणेश हा त्याचा मित्र मुथ्थू गोपाल मुदलीयार याच्यासोबत स्कूटरवरुन रेहजा हॉस्पिटल परिसरातून येत होता. यावेळी भरवेगात जाणार्या एका डंपरने त्यांच्या स्कूटरला धडक दिली होती. त्यात गणेश हा गंभीररीत्या जखमी झाला हेता. त्यामुळे त्याला लोकांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघातानंतर डंपरचालक जखमीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता.
काही वेळानंतर तो स्वतहून माहीम पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने अपघाताची माहिती दिली. त्यानंतर धनराज मुदलीयार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालक धर्मेश प्रजापती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. धर्मेद्र हा दिवा, साबेगाव, यशोदा बाळाराम पाटील नगरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेशच्या अपघाताची मृत्यूची माहिती मिळताच धारावी परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.