मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मार्च 2025
मुंबई, – अकाऊंट ऑपरेटर म्हणून काम करताना स्वतच्या खाजगी कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे 47 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी नाजमा इब्राहिम कुरेशी या 26 वर्षांच्या कर्मचारी तरुणीविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन तिने स्वतच्या बँक खात्यात कंपनीच्या बँक खात्यातून पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरळीतील रहिवाशी असलेले धरुवील कार्तिकभाई शाह हे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचे शुभदा फार्मा नावाची एक कंपनी आहे. या कंपनीत त्यांच्यासह त्यांचे आई-वडिल भागीदार आहेत. त्यांच्या वडिलांचा पन्नास, त्यांचा तीस तर आईचा वीस टक्के हिस्सा आहे. ही कंपनीत फर्म फार्मास्युटिकल्स उत्पादनाचे वितरण असून त्यांची कंपनी शंभरहून अधिक कंपनीकडून फार्मास्युटिकल्स उत्पादने खरेदी करतात. कंपनीचे माहीम येथील शितलादेवी मंदिर रोड, देवदिप अपार्टमेंटमध्ये मुख्य कार्यालय आहे. कार्यालयातील कामकाजाची जबाबदारी त्यांचे वडिल कार्तिकभाई शाह यांच्यावर असून ते स्वत मार्केटिंग हेड म्हणून काम करतात. त्यांच्यावर फर्मचा माल विक्री करणे, पर्चेस ऑर्डर बनविणे, सेल्समनच्या कामावर नियंत्रण ठेवणे आदी काम पाहतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ऑफिस स्टॉफ, अकरा सेल्समन व इतर कामासाठी चौदा कर्मचारी काम करतात.
त्यात नाझमा कुरेशी या तरुणीचा समावेश असून ती कंपनीत अकाऊंट ऑपरेटर म्हणून कामाला होती. सप्लायरचे चेक बनविणे, त्यांचे चेकची तपासणी करणे, बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळण्याची तिच्यावर जबाबदारी होती. 2017 ते 2023 या कालावधीत ती कंपनीत कामाला होती. नंतर तिचे लग्न ठरले आणि तिने ही नोकरी सोडली होती. ती नोकरी सोडून गेल्यानंतर कंपनीत आर्थिक चणचण भासू लागली होती. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची ऑडिट सुरु केले होते. या ऑडिटदरम्यान काही आर्थिक घोळ झाल्याचे दिसून आले होते. काही पेमेंटचे व्यवहार संशयास्पद होते, त्यामुळे या सर्व पेमेंटची पाहणी करण्यात आली होती. त्यात एकाच बँक खात्यात काही पेमेंट झाले होते. या बँक खात्याची तपासणीदरम्यान ते खाते इतर कोणाचे नसून नाजमा कुरेशीचे असल्याचे उघडकीस आले होते.
अकाऊंट ऑपरेटर म्हणून काम करत असनाना नाजमा हिने 27 जुलै 2022 ते 22 मे 2023 या कालावधीत तिच्या पदाचा गैरवापर करुन कंपनीत 47 लाख 69 हजार 466 रुपयांचा आर्थिक घोटाळा केला होता. त्यामुळे तिला कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. यावेळी तिच्याकडे या आर्थिक व्यवहाराची माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती प्रचंड घाबरली आणि कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीच्या वतीने धरुवील शाह यांनी माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नाजमा कुरेशीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.