मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ एप्रिल २०२४
मुंबई, – माहीम येथे हेरॉईन ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या एका २६ वर्षांच्या आरोपी तरुणाला शाहूनगर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सर्फराज अब्दुल माजिद अहमद असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी २७० ग्रॅम वजनाचे हेरॉईन, पाच हजार रुपयांची कॅश, एक मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ५४ लाख रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीतून त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दुजोरा दिला आहे.
माहीम येथे हेरॉईन या ड्रग्जची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती शाहूनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारस्कर, पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय कुरुंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक महादेव शिरसाठ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतेश मस्के, रमेश चव्हाण, शरद आव्हाड, पोलीस हवालदार सोनावणे, पोलीस शिपाई ईलग, आहेर, सपाटे, गोडसे, लोखंडे, आव्हाड यांनी माहीम-शीव लिंक रोड, रहेजा ब्रिजजवळ रविवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री साडेआठ वाजता तिथे सर्फराज अहमद आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटत होती, तो कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना २७० ग्रॅम वजनाचे सुमारे ५४ लाख रुपयांचे हेरॉईन सापडले. या ड्रग्जसहीत कॅश, मोबाईल आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो मूळचा उत्तराखंडचा रहिवाशी असून सध्या वसई-नायगाव परिसरात राहतो. माहीम येथे हेरॉईनची विक्रीसाठी तो आला होता. मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. त्याला ते हेरॉईन कोणी दिले, ते हेरॉईन तो कोणाला देण्यासाठी आला होता. त्याने यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.