मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ डिसेंबर २०२४
मुंबई, – माहीम येथे सुरु असलेल्या निर्माणधीन इमारतीच्या बांधकामाविरुद्ध खोट्या तक्रारी करुन तक्रार मागे घेण्यासाठी ७० लाख रुपयांच्या खंडणीसाठी बिल्डरला धमकी दिल्याप्रकरणी जगन्नाथ पुंडलिक जोगल या आरोपीविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच जगन्नाथ जोगल हा पळून गेल्याने त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नरेश शामलाल चावला हे बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज परिसरात राहतात. त्यांची गाला हॅबिटेटस नावाची कंपनी असून याच कंपनीत ते उपाध्याक्ष म्हणून काम पाहतात. त्यांच्या कंपनीचे विविध ठिकाणी प्रोजेक्ट सुरु आहेत. त्यापैकी एका इमारतीचा प्रोजेक्ट माहीम येथील लेडी जमशेदजी रोड, प्लॉट क्रमांक १०४, टाऊन प्लानिंग स्किम क्रमांक दोनमध्ये सुरु आहे. या इमारतीचे बांधकाम सुरु असताना याच परिसरातील रहिवाशी असलेला जगन्नाथ जोगल हा खोट्या तक्रारी करुन संबंधित बांधकाम बंद पाडण्याचा प्रयत्न करत होता. कंपनीला ब्लॅकमेल करुन तक्रार मागे घेण्यासाठी नरेश चावला यांच्याकडे सतत खंडणीची मागणी करत होता. ७० लाखांची खंडणी दिली नाहीतर त्यांना बांधकाम बंद पाडण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्यांनी जगन्नाथशी चर्चा केली होती. यावेळी त्यांच्या तडजोडीनंतर पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते.
याच पैशांसाठी तो त्यांना कॉल आणि बांधकाम साईटवर येऊन धमकी देत होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्याला २५ हजार रुपये दिले होते. तरीही तो उर्वरित पैशांसाठी त्यांना धमकावत होता. त्याच्याकडून सतत मिळणार्या धमकीला कंटाळून नरेश चावला यांनी माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जगन्नाथ जोगलविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.