मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 एप्रिल 2025
मुंबई, – माहीम येथील सिताराम किर मार्गावरील वडके हाऊस पुर्नविकासात गुंतवणुकीवर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जगदीश पोपटलाल गोहिल या बिल्डरविरुद्ध माहीम पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. जगदीशने तक्रारदारासह इतर लोकांकडून 4 कोटी 42 लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न देता संबंधितांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसाकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रशांत जनार्दन पळ हे 47 वर्षांचे व्यावसायिक असून ते माहीम परिसरात राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांची जगदीश गोहीलशी ओळख झाली होती. जगदीश हा बिल्डर असून त्याच्या मालकीची पॅरागॉग कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. या कंपनीने माहीम येथील सिताराम किर मार्गावरील वडके हाऊस या प्लॉटचा पुर्नविकासाचे काम हाती घेतले होते. याच प्रोजेक्टमध्ये त्यांनी गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा किंवा फ्लॅट देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. जगदीशवर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्या वडके हाऊस प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
1 जानेवारी 2020 ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीत त्यांनी फ्लॅटसाठी जगदीशीला 32 लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत प्रोजेक्टचे काम सुरु झाले नव्हते. या कंपनीची माहिती काढताना त्यांना कंपनीत जगदीश गोहिल हा एकटाच मालक नूसन ती कंपनी पार्टनरशीप फर्म असल्याचे समजले होते. त्यात चार भागीदार आहेत. या चौघांनी मिळून हा प्रोजेक्ट हाती घेतला होता. त्यामुळे त्यांनी इतर तीन पार्टनरची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. या भेटीदरम्यान त्यांनी त्यांच्याशी जगदीश गोहिलसोबत झालेल्या व्यवहाराची माहिती दिली होती.
मात्र या तिघांना जगदीशने त्यांच्यासोबत झालेल्या कराराबाबत काहीच कल्पना दिली नव्हती. त्याच्या कंपनीचे एकच बॅक खाते असून ते खाते सध्या बंद आहे. कंपनीचे दुसरे कुठल्याही बँकेत खाते नसल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे जगदीशला त्याच्या हिस्स्यापेक्षा अतिरिक्त फ्लॅटचा ताबा देण्यात आला आहे. या फ्लॅटची त्याने परस्पर विक्री करुन त्यांच्याकडून पैसे घेतले होते. अशा प्रकारे जगदीशने त्यांच्यासह इतर काही लोकांकडून फ्लॅटसाठी 4 कोटी 42 लाख 50 हजार रुपये घेतले होते. या फ्लॅटची परस्पर विक्री करुन संबंधित फ्लॅटधारकाची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच प्रशांत पळ यांनी माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जगदीश गोहिलविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा माहीम पोलिसाकडून तपास सुरु आहे. याच गुन्ह्यांत जगदीशची पोलिसाकडून लवकरच चौकशी होणार आहे. प्रशांत पळ यांच्या अर्जात आतापर्यंत 4 कोटी 42 लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असली तरी फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.