माहीम पोलीस वसाहतीतील घरफोडीप्रकरणी आरोपीस अटक
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार; नऊहून अधिक गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑगस्ट २०२४
मुंबई, – तीन दिवसांपूर्वी माहीम पोलीस वसाहतीत झालेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात माहीम पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी कमरुद्दीन शेख नावाच्या एका रेकॉर्डवरील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध नऊहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजाराम भिकू मोहीत हे पोलीस हवालीदार असून माहीमच्या पोलीस वसाहतीत त्यांच्या कुटुंबियंसोबत राहतात. गेल्या दोन वर्षांपासून ते मिळकत व्यवस्थापक म्हणून काम करत असून त्यांच्यावर माहीम पोलीस वसाहतीची माहिती अद्यावत ठेवणे, रुम खाली झाल्यास त्याबाबत शासनाला कळविलणे, नवीन रुम कोणाला शासनाने दिली तर त्याची माहिती वरिष्ठांना देणे आदी कामाची जबाबदारी आहे. त्यांना मदतनीस म्हणून तीन महिला पोलीस शिपाई काम करतात. दोन दिवसांपूर्वी ते पाण्याच्या टाकीबाबत निरीक्षक करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पोलीस वसाहतीमधील इमारत क्रमांक इमारत क्रमांक चार-अच्या रुम क्रमांक ०५, ०७, १० आणि २१, इमारत क्रमांक चार बीच्या रुम क्रंमांक ६७, ६८, ७७, ८५, इमारत क्रमांक एक-अ च्या रुम क्रमांक ३९, इमारत क्रमाक दोन-बीच्या रुम क्रमांक ६६, ६७, इमारत क्रमांक सतराच्या रुम क्रमांक ५६, इमारत क्रमांक सोळा-बीच्या रुम क्रमांक ५४, तसेच फिशरमन कॉलनी इमारत क्रमांक १९च्या रुम क्रमांक ८८८ (फर्स्ट स्टेप नावाचे प्लेग्रुप व नर्सरी), इमारत क्रमांक १९ चे एक खाजगी कार्यालयात चोरी झाल्याचे तसेच चोरीचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश करुन काही चांदीचे दागिने, कॅश आणि इतर साहित्य चोरी केले होते. इतर फ्लॅटचे सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. घरफोडीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता.
आरोपीचा शोध सुरु असताना सहाय्यक पोलीस आयुक्त संजय करुंदकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिलाल शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपकर, पोलीस उपनिरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिरजे, पोलीस शिपाई ससाणे, कांबळे, घरत, शिंदे यांनी सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन कमरुद्दीन शेखला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कमरुद्दीन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध कुर्ला, दिडोंशी, माहीम आणि ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात नऊहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. लवकरच त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.