मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ जानेवारी २०२५
मुंबई, – तिक्ष्ण हत्याराने एका अज्ञात व्यक्तीची हत्या झाल्याची घटना माहीम परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर मारेकर्याने पलायन केले असून त्याच्याविरुद्ध माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या मारेकर्याच्या अटकेसाठी माहीम पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यता आला असून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केल्याचे सांगण्यात आले.
ही घटना मंगळवार १४ जानेवारी दुपारी तीनच्या सुमारास माहीम येथील रामगडच्या खाडी, पाईपलाईनजवळ उघडकीस आली आहे. या परिसरात एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. या माहितीनंतर माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला पोलिसांनी जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू त्याच्याकडे सापडली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही.
क्षुल्लक कारणावरुन अज्ञात व्यक्तीने मृत व्यक्तीची कोणत्या तरी घातक शस्त्रांनी वार करुन हत्या केली होती. हत्येनंतर त्याचा मृतदेह खाडीत फेंकून त्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक मेहबूब सरवर खान पठाण यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या मारेकर्याचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारीही संमातर तपास करत आहेत.