मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 मे 2025
मुंबई, – चोर समजून केलेल्या बेदम मारहाणीत हसन मेहबूब शेख या 40 वर्षांच्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना माहीम परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच मोहम्मद अस्लम अन्सारी या मारेकरी आरोपीस माहीम पोलिसांनी अटक केली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता माहीम येथील एस. एल रेहजा मार्ग, फिशरमॅन कॉलनी, इमारत क्रमांक 21 च्या दक्षिण भिंतीजवळील आवारात घडली. ख्वाजा मेहबूब शेख हा माहीमच्या फिशरमॅन कॉलनी, रामगढ झोपडपट्टीत राहत असून चालक म्हणून काम करतो. मृत हसन हा त्याचा मोठा भाऊ असून तो बिगारी कामगार म्हणून कामाला आहे. हसन व त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होता, त्यामुळे त्याची पत्नी गेल्या चार वर्षांपासून तिच्या कर्नाटक येथील माहेरी राहते.
हसनला आकडी येत असल्याने तो नेहमीच घरवाजा उघडा ठेवून झोपतो. गुरुवारी रात्री उशिरा दिड वाजता ख्वाजा शेख हा हसन झोपला आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच्या बाजूला असलेल्या घरी गेला होता. यावेळी त्याला त्याच्या कपड्याला रक्ताचे डाग दिसले. त्याला पाहिल्यानंतर त्याच्या हाताला, पायाला मारहाणीचे अनेक जखमा होत्या. त्याचे हात, पाठ, छाती काळीनिळी पडली होती, त्यामुळे त्याने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने मोहम्मद अस्लमने त्याला मारहाण केल्याचे सांगितले. त्याची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे ख्वाजाने त्याला तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा सकाळी आठ वाजता मृत्यू झाला.
चौकशीदरम्यान हसन हा परिसरात फिरत होता. यावेळी मोहम्मद अस्लमला तो चोर असून चोरीसाठी तिथे आला असावा असे वाटले. त्यामुळे त्याने हसनला बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. याच अवस्थेत तो घरी आला होता. त्यानंतर ख्वाजा त्याच्या घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी ख्वाजाच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी मोहम्मद अस्लमविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. चोर समजून मोहम्मद अस्लमने हसनला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.