शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून तरुणावर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून आतिक या तरुणावर दोघांनी तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. जखमी झालेल्या आतिकवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी माहीम पोलिसांनी दोन्ही मारेकर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत फरमान फिरोजअली शेख या १९ वर्षांच्या आरोपीस अटक केली आहे. त्याचा दुसरा सहकारी अब्दुल्ला हा पळून गेला असून त्याला या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी सात ते आठच्या सुमारास माहीम येथील एल. जे रोड, ब्रुण्ड प्लनेट कापड दुकानासमोर घडली. आयान वसीक खान हा तरुण शाहूनगर परिसरात राहत असून कॉलेजमध्ये शिकतो. याच परिसरात आतिक हा राहत असून तो त्याचा मित्र आहे. रविवारी आयान हा त्याचा मित्र मोहम्मद अली ऊर्फ मानव याच्यासोबत रस्त्यावरुन जात होता. यावेळी फरमान व आणि अब्दुल्ला यांनी त्यांना पाहून विनाकारण शिवीगाळ केली होती. त्यामुळे आयान, त्याचा भाऊ आफ्ताब आणि आतिक यांनी त्यांना शिवीगाळ का केली याचा जाब विचारला होता. त्यातून त्यांच्यात भांडण झाले आणि रागाच्या भरात त्यांनी त्यांना लाथ्याबुक्यांनी, कमरेच्या ब्लेटने बेदम मारहाण केली होती.
काही वेळानंतर फरमानने त्याच्याकडील चाकूने आतिकवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. जखमी झालेल्या आतिकला आयानने तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आयान खानच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फरमान आणि अब्दुल्ला याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या फरमानला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अब्दुल्ला हा पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.