मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – चालताना धक्का लागला म्हणून मोहम्मद कातिक या ३२ वर्षांच्या तरुणावर अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्यात मोहम्मद कातिक हा गंभीररीत्या जखमी झाला असून वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध माहीम पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता माहीम येथील सेनापती बापट मार्ग, माहीम रेल्वे स्थानकाच्या गेट बाहेरील दक्षिण वाहिनीवर घडला.
मोहम्मद बिलाल मुन्ना खान हे धारावी परिसरात राहत असून जखमी मोहम्मद कातिक हा त्यांचा मेहुणा आहे. गुरुवारी रात्री तो त्याच्या पत्नीसोबत मोबाईलवर बोलत माहीम रेल्वे स्थानकाबाहेरील गेटसमोरील रस्त्यावरुन जात होता. यावेळी समोरुन येणार्या एका व्यक्तीला त्याचा चालताना धक्का लागला होता. याच कारणावरुन त्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मोहम्मद कातिकने त्याला शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि या व्यक्तीने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले होते. त्यात मोहम्मद कातिकच्या पार्श्वभागासह कंबरेला, उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता. या घटनेची माहिती मिळताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
जखमी झालेल्या मोहम्मद कातिकला पोलिसांनी तातडीने भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मोहम्मद बिलाल यांच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी पळून गेलेल्या हल्लेखोराविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु असून त्याला लवकरच या गुन्ह्यांत अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.