पोलीस हवालदाराशी हुज्जत घालणार्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
ड्रायव्हिंग लायसन्स मागितला म्हणून शिवीगाळ करुन धमकी दिली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 एप्रिल 2025
मुंबई, – वाहतूक कर्तव्य बजाविणार्या एका पोलीस हवालदाराशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कारचालकासह प्रवाशाविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फैसल अहमद अली आणि मोहम्मद जमशेद फारुख शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही 35 (3) नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली म्हणून या दोघांनी पोलीस हवालदाराला शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती.
ही घटना सोमवारी 21 एप्रिलला सायंकाळी सव्वापाच वाजता माहीम येथील एल. जे रोड, माहीम जंक्शनजवळ घडल्याचे पोलिसांनी सांगितले. समीर हुसैन बेग हे कुर्ला येथील कुर्ला पोलीस लाईन वसाहतीत राहत असून सध्या माहीम वाहतूक पोलीस चौकीत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजता ते माहीम येथील एल. जे रोड, माहीम जंक्शन परिसरात कर्तव्य बजावत होते. यावेळी ओला कंपनीच्या एका पांढर्या रंगाच्या कारला त्यांनी हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कारचालक फैसल अली याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली होती.
मात्र त्याने ड्रायव्हिंग लायसन्स देण्यास नकार देत त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. काही वेळानंतर फैसल अलीसह कारचा प्रवाशी मोहम्मद जमशेद यांनी त्यांच्याशी हुज्जत घालून बघून घेण्याची धमकी दिली. त्यांच्याशी अरेरावी भाषा करुन पुन्हा अश्लील शिवीगाळ केली तसेच त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हा माहिती समीर बेग यांच्याकडून समजताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या माहितीनंतर माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
यावेळी समीर बेग यांच्याशी हुज्जत घालून, त्यांना शिवीगाळ करुन धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर समीर बेग यांच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी फैसल अली आणि मोहम्मद जमशेद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले.